जो शरीरानेंहि नको तसा वागत असतो, दुर्वर्तन करतांना, अनाचार करतांना ज्याला लाज वाटत नाहीं तो अधम. त्याला दुर्जन म्हणावें. ज्याच्या मनांत कांही वेळांतरी नको त्या गोष्टी करण्याची इच्छा होते पण शरीराने जो तसा कधीं वागत नाहीं, क्वचित् एखाद्या वेळीं मोहानें वागतांना चूक झाली तर लगेच ज्याला खंत वाटते, पश्चात्ताप होतो, तो मध्यम. त्याला सज्जन म्हणावें. आणि वाईट वागावे, अनाचार करावा असें ज्याच्या कधीं मनांतहि येत नाहीं मग शरीराने घडण्याची गोष्ट दूरच राहिली, असा जो, तो उत्तम. त्याला सत्पुरुष म्हणावें.