मनुष्य जात्याच बुद्धिमान असल्यानें तो विचार करतो. ऐकणे, वाचणे, अनुभवणे, पाहणे, यामुळे त्याच्या विचारांना चालना मिळते. बुद्धीची मर्यादा, प्रकृति, स्वभाव, यांतील भिन्नता, परिस्थितीचे स्वरूप यामुळे विचारांना निरनिराळ्या दिशा लाभूं शकतात. वेगवेगळी मतें बनतात. तीं कधीं सत्याच्या जवळ असतात. कधीं दूर, कधीं असत्याला सत्य व सत्याला असत्य मानणारी अशीं भ्रांत, कधीं निश्चित, कधी आग्रही, कधीं दुराग्रही, कधीं चंचल, सरड्याच्या रंगाप्रमाणें पालटणारीं, अशीहि तीं असतात.