ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

समाधी मंदिराच्या वर ध्यानमंदिर स्थापिले आहे. गोरट्यातील आध्यात्मिक दिवसाची सुरुवात ध्यानमंदिरातील प्रार्थनेने होते. श्रीसंत तुकाराम महाराज यांचे दोन अभंग व समर्थ रामदास स्वामींचे करुणाष्टके प्रारंभी म्हणली जातात. त्या नंतर १० मिनिटाचे डोळे मिटून मौनयुक्त ध्यान केले जाते. विधिवत मंत्रजागर करून स्वतः पू. अप्पांनी श्रीवरद नारायणाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना या ध्यानमंदिरात केली आहे.

सद्गुरू श्री दासगणू महाराजांच्या अधिकारीक मार्गदर्शनाखाली पू. अप्पांची साधना योग्य दिशेने वाटचाल करित होती. साधनामार्गातील विविध मूर्त संकेतांमुळे त्यास पुष्टी मिळत होती. तथापि त्यामुळे त्यांची भगवंताच्या साकार दर्शनाची क्षुधा वाढतच होती. पू. अप्पांना आता श्री नारायणाच्या रोकड्या प्रचितीची ओढ लागली होती. जेव्हा त्यांची ती ओढ तीव्रतम व असह्य झाली तेव्हा पू. अप्पा स्वतःच्या जीवावर उदार होवून एका निर्धारानेच गंगोत्री येथे अनुष्ठानास बसले. अशा वेळी त्या करुणानिधी प्रभोला पाझर न फुटता तरच नवल ! श्रावण वद्य एकादशी, शके १८९३, सोमवार, दि.१६/०८/१९७१ या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी श्रीवरद नारायणाने पू. अप्पांना साकार स्वरूपात दर्शन दिले.

त्या साकार रुपाचीच प्रतिमा या ध्यान मंदिरात स्थापिली आहे. पू. अप्पांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सांगलीचे सिद्धहस्त व प्रतिभावान चित्रकार कै. कल्याण शेटे यांनी ती प्रतिमा अतिशय सुंदररित्या साकारली आहे. श्रीवरद नारायणाची ही स्मितहास्ययुक्त, प्रसन्न, धीरगंभीर, मनमोहक, विलोभनीय, चित्ताकर्षक व नितांत सुंदर प्रतिमा उपलब्ध होणे, ही आपणा सर्वांसाठी परम भाग्याचीच गोष्ट !

ध्यानमंदिरातील ध्यानाच्या वेळी प्रत्येक साधक त्या प्रतिमेशी एकरूप होवून श्री वरद नारायणाशी आपले अनुसंधान साधत असतो. त्या मुळेच ध्यानमंदिरातील डोळे मिटून मौनयुक्त ध्यानाचा कालावधी १० मिनिटे इतका थोडासा असला तरी त्याचा परिणाम खोलवर व प्रदीर्घ आणि साधकाला आश्वासक असतो. याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायलाच हवी असे हे स्थान आहे. येथील प्रसन्नता, शांतता, पावित्र्य, शुचिता यांचा अनुभव येथे येणाऱ्या प्रत्येकाला हामखास येतो.

साकारले रूप असुनी निर्गुणि l अर्ध पद्मासनी शोभे मूर्ती ll
शंख चक्र धरी गदा अंकावरी l कृपेने उभारी वरद करा ll

ध्यान मंदिर : काही महत्वाच्या सूचना

१. ध्यानमंदिरात स्नान करून मगच जावे.

२. ध्यानमंदिरात स्वतःचे आसनावर ध्यानार्थ बसावे.

३. कोणत्याही संप्रदायाच्या व्यक्तीला येथे बसता येईल.

४. नामजप व धार्मिक ग्रंथाचे पारायण करता येईल.

५. ध्यानमंदिरात कटाक्षाने पूर्ण मौन पाळावे.

६. चिंतनासाठी किमान १० मिनिटे वेळ दिलाच पाहिजे.

७. आठ वर्षाखालील लहान मुलांना ध्यानमंदिरात आणू नये.

८. ज्यांना शांतता पाळणे शक्य नाही अश्या आठ वर्ष वयाच्या पुढील मुलांनाहि येथे आणू नये.

९. एकाग्रतेच्या साधनेसाठी प्रतिदिन सकाळी ७ वाजता सामुदायिक अभ्यास केला जाईल.

१०. श्री वरद नारायणाच्या प्रतिमेला हळद-कुंकू, बुक्का इ. काहीही वाहू नये.