ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

निर्मोह: संयमी योगी शान्तो दान्तो विमत्सर: |
सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||
सुप्रसन्न: समाधानी निश्चयी च दृढव्रती |
सोsस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती ||

 

सज्जन हो, सप्रेम जयहरि.

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

सत्कर्माची प्रेरणा देणारे, अकर्म टाळण्याची सूचना देणारे, सत्याचा निर्देश करणारे, सन्मार्ग दाखविणारे, उत्तम शिक्षण देणारे व सुबोध करणारे – असे सहा जन मनुष्यासाठी गुरु समान असतात, अशा अर्थाचे एक शास्त्र वचन आहे. यातील एका गुणाने संपन्न असलेला गुरु लाभला तरी मनुष्याचे कल्याण होणे निश्चित आहे. आपल्या परम सौभाग्याने आपल्या जे सद्गुरू लाभले ते स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंत दामोदर आठवले उर्फ अप्पा) या शास्रोक्ती नुसार “षडगुणैश्वर्यसंपन्न” असे लाभले आहेत. एका भाविकाने स्वामीजींच्या गुणविशिष्टांचे वर्णन करणारा एक श्लोक रचला आहे. तो श्लोक असा –

भाषापंडित, सिद्धहस्त कवि ते, खासे टीकाकार ते |
नामी कीर्तनकार, निस्पृह खरे, तत्वज्ञ, आचार्य ते ||
ज्ञाते, साधक, राष्ट्रभक्त कडवे, सर्वज्ञ मर्मज्ञ ते |
कोणा काही असोत, ब्रह्मच आम्हा ते बोलते चालते ||

वरील श्लोक वाचला असता स्वाभाविकपणे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या स्वरूपाचे प्रतिबिंब मनचक्षूंपुढे उभे राहते. अशा या शतपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अष्टावधानी महापुरुषाचे अनंतचतुर्दशी शके १९४१ (गुरुवार, १२ सप्टेंबर २०१९) ते अनंतचतुर्दशी शके १९४२ (मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२०) या दरम्यान जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने आपल्या परिवारसाठी फार महत्वाचे वर्ष आहे. हे वर्ष विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा श्री दासगणू प्रतिष्ठानने निश्चय केला आहे.

सद्गुरुंच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरहि आपल्या परंपरेनुसार अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्या नुसार गोरट्यात नामांकित व्याख्यात्यांची पुढील वर्षभर प्रतिमाह एक या नुसार उद्बोधक १२ व्याख्याने, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विविध शहरात, गावागावात आपल्या परंपरेनुसार कीर्तने, ग्रंथपारायणे, व्याख्याने, परिसंवाद यांचा समावेश असलेली ३५ शिबिरे होणार आहेत. आपापल्या गावातून अधिकाधिक प्रचार करून या शिबिरातील कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न व्यवस्थापकांनी करणे अपेक्षित आहे. या सर्व कार्यक्रमांचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सद्गुरु पू. अप्पांनी अनेकाविध धर्मग्रंथांचे कठोर तपस्येने परिशीलन करून साधकांसाठी साररूप ग्रंथसंपदा सिद्ध केली आहे. पू. अप्पांचे हे विपुल विद्यावैभव सर्वांसाठीच उपलब्ध आहे. त्या सर्व ग्रंथसंभाराचे गोरट्यात पारायण करण्याचे नियोजन झाले आहे. जीवनास मार्गदर्शन करणाऱ्या, साधकास प्रेरित करणाऱ्या, देशभक्तास प्रज्वलित करणाऱ्या अमोघ तेजस्वी अशा या वाङ्मय पारायण यज्ञात प्रत्येकाने आपली पारायणरुपी समिधा अर्पण करावयाची आहे. पू. अप्पांनी समाधी घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या काव्यात स्वतः म्हटले आहे, “मी म्हणजे ना शरीर l मी मद्ग्रंथांचा संभार ll” सद्गुरुंच्या अशा तेजस्वी वाङ्मय रूपाचे अवलोकन करण्याची संधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ग्रंथांच्या परायणाने उपलब्ध झाली आहे. श्रीदासगणू परिवारातील अनुग्रहित सदस्याने या पैकी कमीत कमी एका ग्रंथाचे पारायण कर्तव्य भावनेने श्रद्धापूर्वक गोरट्यात येऊन करणे अपेक्षित आहे. गोरट्यात होणाऱ्या या सर्व पारायणाचे वेळापत्रकहि या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सद्गुरुंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उत्स्फूर्तपणे अजूनहि काही कार्यक्रमांचे नियोजन विविध शहरातून होत आहे. गोरट्यात “१०० ठिकाणी १०० जणांचे विष्णुसहस्रनाम” असा अभिनव उपक्रम सुरु झाला आहे. कमीत कमी १०० भाविकांनी १०० घरी जाऊन १०० दिवस रोज एक पाठ म्हणायचा असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यातहि पुढील वर्षभर महिन्यातून एकदा भाविकांनी जमून ठराविक संख्येचे सामुदायिक विष्णुसहस्रनाम पाठ म्हणण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमासहि उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. “अधिकस्य अधिक फलम्” या न्यायाने आपण सद्गुरुंसाठी करू तितके कमी आहे. मुख्य म्हणजे ते त्यांच्या साठी नसून स्वतःच्या कल्याणासाठीच आहे हे निश्चित !

थोडक्यात काय तर पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आपण साधकांनी दणाणून टाकायचे आहे. संत वचनात थोडासा पालट करून म्हणावेसे वाटते “गुरु मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा” ! स्वतःचे कल्याण साधण्यासाठी सारांश रूपाने एकच सांगावे वाटते –

किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च । दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम् ॥
: भावार्थ :
खूप बोध केला तरी काय अन् करोडो शास्त्र धुंडाळले तरी काय ? गुरुकृपे शिवाय चित्ताला परम शांती मिळणे दुर्लभ आहे.

सद्गुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनीच सांगितलेली, त्यांना प्रिय असणारी साधना करून त्यांच्या कृपादानाला पात्र ठरून स्वतःचे कल्याण साधण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू या !

धन्यवाद.

– अध्यक्ष –
श्रीमद्सद्गुरू श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान,
गोरटे, ता.उमरी, जि.नांदेड.