भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥