मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥

मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१

मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥