ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

श्रीदासगणू महाराजांचा या वर्षीचा जयंती उत्सव १५० वा जयंती उत्सव होता. हा उत्सव पौष शु. दशमी ते द्वादशी शके १९३९ म्हणजेच दि. २८, २९ व ३० डिसेम्बर २०१७ या दरम्यान अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प. पू. अप्पांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीसाठी काही धोरणे निश्चित करून दिली आहेत. पू. अप्पांनी नेमून दिलेल्या मार्गाने जाण्यातच आपले परम कल्याण आहे. त्याच अनुषंगाने गेले काही वर्षे प्रतिष्ठान पू. अप्पांनी राबविलेल्या उपक्रमांचे पुनरावर्तन करीत आहे. सद्गुरू श्रीवामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्या शतकोत्तर पुण्यतिथीच्या वर्षामध्ये (इ. स. १९९६ साली) पू. अप्पांनी संतचरणरज संकलानाचा उपक्रम राबविला होता. श्रीदासगणू महाराज विनम्र भावाने स्वतःला ‘सकलसंतचरणरज’ म्हणवून घेण्यात धन्यता मानायचे. हीच या उपक्रम राबविण्या मागची प्रेरणा ! श्रीदासगणू महाराजांच्या सार्धशती जयंती वर्षानिमित्त या मोठ्या उपक्रमाचे प्रतिष्ठानने पुनरावर्तन करण्याचा संकल्प केला. ‘सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर’ या उक्ती प्रमाणे हा मोठा उपक्रम सुबक नियोजनानुसार परिवारातील ज्येष्ठ व आधिकारिक मंडळींच्या मार्गदर्शनाखाली व परिवारातील अनेक सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास गेला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश याहि राज्यातील एकूण १५० पेक्षा अधिक क्षेत्रांच्या ठिकाणची मृत्तिका संकलन करण्यात आली. (या सर्व ठिकाणांच्या यादी साठी येथे click करा.) या उपक्रमाच्या योजनेअंतर्गत त्या त्या संतांच्या ठिकाणी जावून तेथील मान्यवर / अधिकारी मंडळींच्या हस्ते मृत्तिका संकलन करणे, तेथील संतांचे / देवतेचे पूजन करणे, श्रीदासगणू महाराजांनी लिहिलेल्या त्या संताच्या ओवीबद्ध चरित्राचे वाचन / कीर्तन करणे, आरती व प्रसाद वाटप असा कार्यक्रम आखला होता. या सर्व ठिकाणच्या जमा केलेल्या मृत्तिकांचे एका कलशात एकत्रीकरण करून त्या कलशाचे विधिवत पूजन व स्थापना करण्यात आली.

उत्सवाच्या तिन्ही दिवशी सकाळच्या प्रार्थनेनंतर डॉ.कल्याणीताई नामजोशी यांची प्रवचने झाली. ‘आधुनिक काळातील संत’ हा विषय त्यांनी प्रवचनासाठी घेतला होता. आधुनिक संतांची व त्यांच्या कार्याची माहिती डॉ.नामजोशी यांनी श्रोत्यांना करून दिली. प.पू. दासगणू महाराजांनी रचलेला ‘श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी’ म्हणजे सहस्रनामातील नावांचा सुलभ अर्थ सांगणारा ओवीबद्ध ग्रंथ !  उत्सवकाळात या ग्रंथाचे पारायण करण्यात आले.

पहिला दिवस (गुरुवार, पौष शु. १०, १९३९, दि. २८/१२/२०१७)

उत्सवाच्या पहिल्या दिवसाचे ‘श्रीसंतचरणरजकलशाची शोभायात्रा’ हे मुख्य आकर्षण होते. एका मोठ्या रथात या कलशाची स्थापना करून त्याची गोरटे गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्वात समोर भजनी मंडळ होते. त्या नंतर पुरुष मंडळी सकल संतांचा जयघोष करीत, संतांचे अभंग म्हणत व नामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होती. त्या नंतर रथ चालला होता. रथापुढे संतांच्या वेशातील बालकांचा चमू चालला होता. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोरोबा काका, जनाबाई, मीराबाई, साईबाबा, सावतेबुवा, सेना महाराज, रामदास स्वामी, एकनाथ महाराज अशा विविध संतांची वेशभूषा या बालकांनी केली होती. त्यांना पाहून मन प्रफुल्लीत होत होते. रथाच्या मागे महिला मंडळ मार्गक्रमण करीत होत्या. आदरणीय वसुताई ध्वनीप्रक्षेपकाच्या सहाय्याने ‘काय वर्णू या संतांचे उपकार’, ‘तुम्ही सनकादिक संत’, ‘धन्य आजी दिनू संत दर्शनाचा’ या सारखी संतांची थोरवी व महती सांगणारे संतांचे अभंग सांगत होत्या व महिला मंडळ ती भजने एक सुरात गात होत्या. गोरटे गावातील ग्रामस्थांनी तोरणे लावून, फटाके फोडून या शोभायात्रेचे स्वागत केले तर गावातील सुवासिनींनी सडा-सारवण करून, रांगोळ्या काढून व औक्षवण करून या कलशाचे जागोजागी पूजन केले. अत्यंत भावपूर्ण व प्रसन्न वातावरणात ही शोभायात्रा गोरटे गावात मिरवून पुन्हा मंदिरात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.महेश अण्णा व सर्व विश्वस्त मंडळी शोभायात्रेत सहभागी झाली होती. मृत्तिकाकलशाची अस्थायी स्वरूपात कीर्तन मंडपात स्थापना करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांनी मनोभावे कलशाचे दर्शन घेतले.

दुपारची आरती, मंत्रपुष्प, स्तोत्रे व भोजन प्रसाद झाल्या नंतर संतभूमीतून आलेल्या अतिथींचा सत्कार करण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी जाऊन मृत्तिका संकलन केले आहे, त्या सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. त्यापैकी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मग ते, त्या संतांचे वंशज असतील, त्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी असतील, स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सदरच्या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहता आले ही आमच्या भाग्याची गोष्ट आहे, अशा भावना सत्काराला उत्तर देताना या मान्यवरांनी व्यक्त केल्या.

सायंकाळी ०५ ते ०७ या दरम्यान श्री. विक्रम नांदेडकर यांनी कीर्तन सेवा सादर केली. श्रीसंत दामाजीपंत हे आख्यान त्यांनी सांगितले. विषयाचा नेमकेपणा व प्रभावी सादरीकरण, ही त्यांच्या कीर्तनाची प्रमुख वैशिष्ट्ये याही वेळी दिसून आली. त्यांना श्री. पद्मनाभ आठवले यांनी गायनसाथ केली.

रात्री ०९ च्या पाठानंतर मृत्तिकासंकलनाच्या कार्यासाठी गेलेल्या प्रत्येक गटांपैकी एका प्रतिनिधीचे मनोगत सादरीकरणाचा कार्यक्रम ठेवला होता. सर्वच प्रतिनिधींनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. त्यांना आलेले हृद्य अनुभव, अनोळखी ठिकाणी जाऊनहि झालेले उत्तम स्वागत, मिळालेली प्रेमपूर्वक वागणूक, लाभलेला स्नेह व या सर्वांमुळे जुळून आलेले ऋणानुबंध – या सर्व मनाच्या कप्प्यात जतन करून ठेवलेल्या असंख्य आठवणी सांगताना प्रत्येकाला काय अन् किती सांगू असे झाले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच प.पू. दादा व प. पू. अप्पा यांच्या कृपाशिर्वादाचा मूर्त अविष्कार अनुभवायची संधी मिळाली होती, हे त्यांच्या मनोगतातून जाणवत होते. हा उपक्रम हाती घेऊन प्रतिष्ठानने आम्हाला सेवेची संधी उपलब्ध करून दिली या साठी सर्वांनीच प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त केले व भविष्यातहि संधी मिळत राहावी, अशी भावना प्रगट केली.

जयंती वर्षाच्या संख्ये इतके दिवे रात्रभर तेवत ठेवणे या दरवर्षीच्या रिवाजाप्रमाणे १५० व्या जयंती निमित्त १५० दिवे रात्रभर तेवत ठेवले होते. रात्री ०९३० ते पहाटे ०६ पर्यंत भाविक भक्तांनी १/१ तास वाटून घेऊन रात्रभर श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ म्हणत हे १५० दिवे तेवत राहतील याची काळजी घेतली होती.

आजचा दिवस म्हणजे श्रीदामूअण्णांचा स्मृति दिन. त्यांचेही भावपूर्ण स्मरण आज करण्यात आले.

दुसरा दिवस (शुक्रवार, पौष शु. ११, १९३९, दि. २९/१२/२०१७)

पौष शुद्ध एकादशी म्हणजे जयंती उत्सवाचा मुख्य दिवस ! नेहमीप्रमाणे सकाळी ०६ वाजता प्रभात फेरी काढण्यात आली. पाहटे पासूनच सडा-सारवण, रांगोळ्या काढून या फेरीच्या स्वागताची तयारी ग्रामस्थांनी केली होती. संतांचा जयघोष व नामाचा गजर करीत गोरटे गावातील नेहमीच्या मार्गाने जाऊन फेरी पूर्ण झाली. त्या नंतर सर्व भाविक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी गच्चीवर जमा झाले. उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने मंत्रोच्चारात अध्यक्ष श्री. महेशअण्णांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ‘बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी’ हे पू. अप्पांनी रचलेले ‘श्रीसूर्यनारायणस्तोत्र’ सामूहिक स्वरात सर्वांनी म्हणले.

‘कावडी समर्पण’ हे आजचे मुख्य आकर्षण ! गोरटे व परिसरातील भाविक ०८ किमी अंतरावरून श्रीदासगणू महाराजांना प्राणप्रिय असलेल्या गोदावरी नदीवर रात्री जाऊन गोदाजल घेऊन येतात. सकाळी त्या तीर्थाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. मंदिराच्या दारात प्रमुख कावडी धारकांचे पाद्यपूजन होऊन कावडी समर्पणाला सुरुवात होते. अगदी ५/६ वर्षाच्या बालकांपासून ते मध्यमवयीन व वयस्कर असे १५० ते २०० भाविक श्रद्धापूर्वक गोदातीर्थ कावडीतून घेऊन आले व त्या जलाने त्यांनी श्रीदादांच्या समाधीला अभिषेक केला. प्रत्येक कावडी धारकाला नंतर प्रसाद देण्यात आला. गोदास्तोत्र, श्रीजगन्नाथ पंडित रचित गंगालहरी यांचे उच्चारण या वेळी केले गेले. हा सर्व सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नंतर १६ ब्राह्मणांकरवी श्रीदादांच्या समाधीला विधिवत अभिषेक केला गेला.

त्यानंतर श्रीदासगणू महाराजांनी रचलेल्या ‘श्रीसंत स्तोत्र’ याचे सामूहिक वाचन केले गेले व ‘सकलसंतचरणरज’ असलेला तो मंगल कलश ‘संजीवन’ या स्मृतिदालनात नेण्यात आला. तो कलश ‘संजीवन’ या दालनापर्यंत संतांच्या जयजयकारात विश्वस्त श्री.विनायकराव नांदेडकर यांनी स्वतःच्या डोक्यावर ठेवून नेला. तिथे मंत्रोच्चारात श्रीरुक्मिणीपांडुरंगा समोर श्री. महेश अण्णांच्या हस्ते स्थायी स्वरूपात या कलशाची विधिवत स्थापना करण्यात आली. सकलसंतचरणरज असलेला हा मंगल कलश म्हणजे श्रीदासगणू महाराजांचे आगळेवेगळे दर्शनच आहे. संजीवन दालनात या कलशाच्या स्थापनेमुळे तेथिल पवित्रतेत मांगल्याची भर पडली आहे; तिथे असलेल्या सोन्याला जणू चित्ताकर्षक सुगंध प्राप्त झाला आहे.

दुपारची आरती, मंत्रपुष्प, स्तोत्रे व भोजन प्रसाद झाल्या नंतर ०२३० ते ०४३० या दरम्यान प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. श्रीदासगणू प्रतिष्ठान व श्रीराधादामोदर प्रतिष्ठान तर्फे गेले वर्षभर संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती सभेपुढे ठेवण्यात आली. सौ. वसुधा महेश देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘सन्मार्ग दीपक’ या श्रीदासगणू महाराजांच्या संक्षिप्त चरित्र ग्रंथाचे व डॉ.कल्याणीताई नामजोशी यांनी लिहिलेल्या ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या कैलास-मानस यात्रेच्या वर्णनपर पुस्तकाचे श्री. महेश अण्णांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच www.santkavidasganu.org या श्रीदासगणू प्रतिष्ठानच्या अधिकृत website चेहि विमोचन श्री. महेश अण्णांच्या हस्ते करण्यात आले.

सायंकाळी ०५ ते ०७ या दरम्यान श्री. विश्राम नांदेडकर यांनी कीर्तन सेवा सादर केली. त्यांना श्री. विक्रम यांनी गायन साथ केली.  श्री. विश्राम यांनी श्रीदासगणू महाराजांच्या जीवनकार्यावर स्वतः रचलेले आख्यान अत्यंत प्रभावीपणे सादर केले. ते स्वतः उच्च विद्याविभूषित आहेत व कामाचा मोठा व्याप त्यांच्यामागे आहे. असे असतानाही स्वतः कीर्तन रचून सादर केले, याचे सर्वांनाच खुप कौतुक वाटले. श्री. महेश अण्णांनी कीर्तनानंतर तिथेच त्यांना मिठी मारून आपल्या हृद्य भावना व्यक्त केल्या. हा भावपूर्ण व हृदयस्पर्शी प्रसंग उपस्थितांच्या हृदयात कायम स्वरूपी कोरला गेला.

रात्री ०९ च्या पाठानंतर दरवर्षीच्या रिवाजाप्रमाणे श्रीदादांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गोरटे ग्रामस्थांचा इतका उत्साह व इतकी श्रद्धा की या पालखीला मंदिरात परत यायला मध्यरात्रीचे ०२ वाजले होते.

तिसरा दिवस (शनिवार, पौष शु. १२, १९३९, दि. ३०/१२/२०१७)

आज उत्सवाच्या सांगतेचा दिवस ! आज सर्व मंदिर, गाभारा, कीर्तन मंडप फुलांच्या माळांनी सजविला होता. १५० पदार्थांचा नैवेद्य हे आजचे मुख्य आकर्षण ! श्रीदासगणू महाराजांच्या १२१ व्या जयंती निमित्त पू. अप्पांनी १२१ पदार्थांच्या नैवेद्याचा संकल्प पूर्ण केला होता. याहि उपक्रमाचे पुनरावर्तन याच उत्सवात करण्यात आले. त्यानुसार श्रीदादांच्या १५० व्या जयंती निमित्त १५० पदार्थांच्या नैवेद्याचा संकल्प व्यक्त केला गेला. याहि उपक्रमास भाविकांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला. परिवारातील १५० कुटुंबातील माता-माऊल्यांनी श्रद्धापूर्वक त्यांना नेमून दिलेला पदार्थ १५० च्या पटीत तयार करून आणला. सकाळच्या प्रार्थना, प्रवचन व पारायण समाप्ती नंतर या १५० पदार्थांचा नैवेद्य श्रीदासगणू महाराजांना समर्पित केला गेला. हा अपूर्व सोहळा ‘याची देही – याची डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. उपस्थित सर्वांनाच या नैवेद्य अर्पणाचा सोहळा, हे वैभव जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. हा अपूर्व सोहळा डोळ्यात साठवून ठेवताना सर्व भाविकांचे नेत्र अनामिक, अव्यक्त भावनेने कदाचित अत्यानंदाने अविरत पाझरत होते. ते दृश्य साठविण्यासाठी नेत्रातील पाणी बाहेर पडून जणू स्वतःची जागा उपलब्ध करून देत होते की काय !

या सर्वांचा कळस म्हणजे श्री. महेश अण्णांचे गोपाळकाल्याचे कीर्तन ! ‘तद्सद्श्रीकृष्णार्पणमस्तु’ या भावनेने केले जाणारे हे कीर्तन म्हणजे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या उत्सवाचा कळसाध्याय होता. श्री. महेश अण्णांचे भावपूर्ण विवेचन, प्रत्येक लीला-प्रसंगाशी समरस होऊन प्रसंग खुलविणे, विद्यमान घडामोडींची सांगड घालणे, मनापासून खेळ खेळणे व श्री. पद्मनाभ व श्री. विक्रम यांची सुमधुर गायन साथ ! हास्य, करूण, भय, तेज, वीर, वात्सल्य, प्रेम, दया या व अशा अनेक भावभावनांचे मिश्रण असलेले कीर्तन का रंगणार नाही ? भाविकहि या कीर्तनातील प्रसंगाशी समरस होऊन मनापासून साथ देत होते व भगवंताच्या बाललीलांच्या प्रेमरसात पूर्णपणे बुडाले होते.

या १५० व्या जयंती उत्सवात उपस्थित राहून सर्व भाविक धन्यता मानीत होते. पुढील कित्येक वर्षे या अपूर्व, वैभवशाली सोहळ्याच्या आठवणी भाविकांना स्मरत राहून नवसंजीवनी, नवप्रेरणा व आनंद देत राहणार यात लवमात्र शंका नाही. या अपूर्व उत्सवाच्या अवीट स्मृति म्हणजे भाविकांच्या आनंदाचा एक अनमोल, अक्षय ठेवा आहे.  या उत्सवाची जेव्हा जेव्हा आठवण जागी होईल, त्या त्या वेळी उत्सवातील कार्यक्रमाच्या स्मृतीरूपी लाटा भाविकांच्या मन:पटलावर आदळत राहतील व त्यांना त्या मधुर स्मृतींनी चिंब भिजवीत राहतील, हे नक्की !

सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी, सेवेकऱ्यांची मेहनत, ग्रामस्थांची बहुमोल साथ, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि वरद नारायण-दादा-अप्पा यांची कृपा यामुळे हाहि सोहळा भाविकांच्या प्रदीर्घ काळ स्मृतीत राहील असा उत्तमरित्या संपन्न झाला.