ॐ श्री 卐

ll श्रीशंकर ll

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणताना पाठात लक्ष ठेवण्याची क्लृप्ति

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचा पाठ एकदा मुखोद्गत झाला की मुखोद्गत होण्यापूर्वी जितके लक्ष पाठाकडे असते तेव्हढे लक्ष पाठाकडे राहत नाही. मुखाद्वारे पाठ सुरु असतो पण चित्त दुसरीकडेच असते.

माला तो फिरे कर में, जीभ फिरे मुखमाही l

मनुवा फिरे दस दिशा, यह तो सुमीरन नाही ll

(काही सन्माननीय अपवाद वगळता) असा अनुभव बहुतेक सर्वांचाच ! बहुदा यांत्रिक पद्धतीने पाठ म्हणल्या जातो. पाठ पूर्ण झाल्यानंतरच पाठ संपल्याचे लक्षात येते.

पू. स्वामी वरदानंद भारती (अप्पा) यांनी पाठ म्हणण्याच्या या यांत्रिक पद्धतीला अगदीच नाकारले आहे, असे नाही. तथापि भगवंताच्या नामाकडे, त्या नामाच्या अर्थाकडे लक्ष पुरवून पाठ म्हणल्यास त्याचे महत्व व साफल्य विपुल प्रमाणात त्यांनी विशद केले आहे. एकदा पू. स्वामींनाच एकाने विचारले की, “अप्पा, तुम्हाला पाठ म्हणायला किती वेळ लागतो?” त्यावर पू. अप्पा म्हणाले, “कधी कमी वेळेत म्हणजे अगदी १२ ते १५ मिनिटात पाठ होतो तर कधी ३-३ दिवस एका पाठाला लागतात.” साधारणतः १५ मिनिटात पूर्ण होणाऱ्या एका पाठाला पू. स्वामींना ३-३ दिवस का लागतात, याचे मर्म विचक्षण साधकाने ओळखले पाहिजे.

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील सर्व नामांचा अर्थ लक्षात यावा या साठी श्रीराधादामोदर प्रतिष्ठान, पुणे, यांनी प्रसिद्ध केलेल्या “सार्थश्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र” या पुस्तकाचा साधकाने अवश्य उपयोग करावा, जेणे करून पाठ म्हणण्यातील यांत्रिकता दूर होऊन भगवंताच्या नावाप्रति भाव वृद्धिंगत होईल.

पाठ म्हणण्यातील यांत्रिकता कमी होण्याच्या दृष्टीने येथे दिलेला उपायहि करून बघायला हरकत नसावी. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे १०७ श्लोकांचे आहे. पाठानंतर प्रत्येकवेळी म्हणल्या जाणारे “सर्वप्रहरणायुध ॐ नमः इति ll” व “हरये नमः l हरये नमः ll हरये नमः lll” या दोन ओळींचा अजून एक श्लोक गृहीत धरल्यातर तो पाठ १०८ श्लोकांचा होतो. आता याची विभागणी करू. या साठी २७ मण्यांच्या छोट्या जपाची माळ उपयोगात आणावी लागेल. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या एका श्लोकात दोन ओळी असतात. त्यातील एका ओळीसाठी एक मणी या प्रमाणे अश्या २७ मण्यांच्या ८ माळा पूर्ण झाल्या की एक पाठ पूर्ण होतो. म्हणजे २७ x ८ = २१६ ÷ २ = १०८. बाजारात (विशेषतः पंढरपूर, सज्जनगड, गोंदवले येथे) अश्या २७ मण्यांच्या जपाच्या छोट्या माळा विकत मिळतात.

आता या ८ माळा म्हणत असताना प्रत्येक माळेच्या प्रारंभी (माळेच्या पहिल्या मण्याला) श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील कोणती ओळ येते ते पाहू या.

 

माळ क्र.

माळेच्या प्रारंभी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील येणारी ओळ

शेरा

ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः

– –

वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः

२ माळीनंतर पाठाचा एकचतुर्थांश भाग पूर्ण

वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः

– –

करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः

४ माळीनंतर पाठाचा अर्धा भाग पूर्ण

जीवो विनयितासाक्षी मुकुंदोऽमितविक्रमः

– –

अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः

६ माळीनंतर पाठाचा तीनचतुर्थांश भाग पूर्ण

चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः

– –

अनिर्विण्णः सदामर्षी लोकधिष्ठानमद्भुतः

८ माळीनंतर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचा एक पाठ पूर्ण

 

वरील प्रमाणे माळ संपताना व पुढची माळ सुरु होताना सतत लक्ष ठेवून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचा पाठ म्हणला तर त्यातील नामावरहि आपोआप लक्ष केंद्रित होईल. याचा सतत अभ्यास होऊन ही सवय अंगवळणी पडल्यावर, नंतर पुढे या माळीचीहि आवश्यकता भासणार नाही आणि श्रीज्ञानदेवांनी हरिपाठात म्हणल्याप्रमाणे “ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी l धरोनी, श्रीहरि जपे सदां ll” हे परम ध्येय सहज साध्य होण्यास नक्कीच मदत होईल.

नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींची ॥१॥

न लगती सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥२॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥३॥

रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥४॥

यावीण असतां आणीक साधन । वाहातसें आण विठोबाची ॥५॥

ज्ञानदेव म्हणे सोपें आहे सर्वांहूनि । शहाणा तो धणी घेतो येथें ॥६॥

ll इति शम् ll

ॐ श्री 卐 ll श्रीशंकर ll ॐ श्री 卐