ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

(१२) दि.०६/०२/२०१९, बुधवार = सातारा ते परळी, ता. सातारा.

अंतर १३ किमी / मुक्काम : श्री काडसिद्धेश्वर आश्रम, परळी.

नेहमीप्रमाणे सर्वजण लवकर आवरून प्रातःकालीन प्रार्थनेला बसले. प्रार्थनेनंतर भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा नेहमीप्रमाणे रंगला व दिंडी मार्गस्थ झाली. सातारा शहरातील मुख्य चौकात भूयारी मार्गाचे मोठे काम सुरू असल्याने रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. नेहमीची मंडळीहि रस्ता चुकत होती; आम्ही सर्वजण तर परगावचे होतो. येथे पुन्हा श्री.भिडे काकांचे सहकार्य लाभले. त्यांनी त्यांचे मित्र श्री.बाबूजी नाटेकर (वि.हिं.प.चे राज्य पातळीवरचे पदाधिकारी) यांना मदतीसाठी बोलावून घेतले. काल पाठाच्या वेळी सर्वांना तशा सूचना दिल्या होत्या की, सातारा शहरातून बाहेर पडेपर्यंत आज सर्वांनी श्री.भिडे काकांच्या सोबतच राहायचे. श्री.बाबूजी नाटेकर व श्री.भिडे काका यांच्या ‘मार्ग’ दर्शनाखाली आम्ही ती अडचणीची शर्यत व्यवस्थित पार करून नियोजित मार्गाला लागलो.

पुढे छत्रपतींच्या विद्यमान वंशजांचे “अदालत वाडा” हे घर लागले. त्यापुढे थांबून आम्ही शिवशंभूंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. छत्रपतींनी केलेल्या लढवैय्या संस्काराचा आजहि साताऱ्यात प्रत्यय येतो. भारतीय सैन्य दलाला महाराष्ट्रातून सर्वात जास्त सैनिक सातारा जिल्ह्यातून पुरविले जातात. गावातील किमान एक तरुण सैन्यात नाही, असे सातारा जिल्ह्यात एकहि गाव नाही. तसेच गावात असलेल्या सर्व घरातील किमान एक तरुण सैन्यात भरती आहे, अशी उज्ज्वल परंपरा असलेले अनोखे गाव सातारा जिल्यात आहे. “भारतीय सैन्य दलाचा विजय असो” अशी मोठ्या आवाजात घोषणा देऊन या सर्वांना आम्ही वंदन केले.

व्यवस्थापक मंडळींनी नेहमीप्रमाणे वाटेत सर्वांना न्याहरी पुरविली. न्याहरी नंतर बरेच चालून गेल्यावर आम्ही झाडाखाली बसलो. तेथेहि भजन / गवळणी म्हणण्याचा कार्यक्रम झाला. बाजूला असलेल्या शेतकरी कुटुंबाने आम्हाला चहा करून दिला. त्यांचे आभार मानून पुन्हा आम्ही मार्गस्त झालो. आमच्या दिंडीचे ध्येयरूप असलेला सज्जनगड किल्ला आता नजरेच्या टप्प्यात आला होता. पुढे उर्वशी (उरमोडी) नदी ओलांडून आम्ही परळीला काडसिद्धेश्वर आश्रमात येऊन पोहंचलो. गडाच्या अगदी पायथ्यालाच हा आश्रम आहे. गडावर जाण्यासाठी मूळ वहिवाटीचा पायऱ्यांचा जुना रस्ता या आश्रमाच्या अगदी बाजूलाच आहे. शेजारीच उरमोडी धरण आहे. निसर्गरम्य ठिकाणी प्रशस्त जागा या आश्रमाला मिळाली आहे. कोल्हापूरच्या काडसिद्धेश्वर आश्रमाची ही एक शाखा आहे. येथे या परिसरातील ४२ अनाथ व गरीब विद्यार्थ्यांच्या निवासी शिक्षणाची सोय केली आहे.

आज जिलेबीचा बेत होता. छान जेवण करून मंडळी विश्रांतीसाठी आपापल्या जागेवर गेली. आज कोणाचे व कोणते कीर्तन असणार याचा अंदाज घेणे चालू होते. पण आ.वसू ताईंचे आजचे नियोजन वेगळेच होते. उद्या गडावर गेल्यानंतर पारायण समाप्ती करण्याच्या दृष्टीने आज भरपूर वाचन करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी आज दासबोध वाचनावरच जोर दिला. बरं, जोर द्यावा तरी किती ? सलग ०४३० तास ! आम्हाला तितक्या बैठकीची सवय नसल्याने अधूनमधून आमच्यासाठी त्या वाचनात विराम घेत होत्या; स्वतः मात्र जागा सोडली नाही. पू. अप्पांसमवेत ग्रंथलेखनाच्या वेळी अशी बैठक करावी लागायची असे त्यांच्याच कडून ऐकले होते, त्याचा आज आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला. ०४ ते ०५ / ०५३० ते ०६३५ / ०६५० ते ०७३० असे सलग वाचन झाले. त्यानंतर पाठ झाला व नंतर या आश्रमाच्या स्वामीजींच्या उपस्थित छोटा कार्यक्रम झाला. असे एकूण ०४३० तास वसू ताई एकाच जागी बसून होत्या.

या आश्रमाच्या स्वामीजींच्या उपस्थितीत तेथील विद्यार्थ्यांनी दोन गीत सादर केले. स्वामीजींनी आमच्या या उपक्रमाचे कौतुक केले व दर वर्षी आवर्जून येण्याचा आग्रह केला. पदयात्रींच्या वतीने श्री.बाबा काचरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सत्कार्याला मदत म्हणून देणगीहि देण्यात आली. तसा हा आमचा शेवटचा मुक्काम होता. पुढील दोन दिवस गडावर संस्थानतर्फे सर्व व्यवस्था होणार होती. हे लक्षात घेता, आमच्याकडे शिल्लक राहिलेला बहुतेक सर्व शिधा, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, स्वैपाकाचे सर्व साहित्य व्यवस्थापक मंडळाने या आश्रमाच्या हवाली केले. आमच्या मुलांच्या हे कामाला येईल, असे म्हणत आंनदाने त्यांनी त्याचा स्वीकार केला.

आज बाहेर गावाहून बरेच भाविक पदयात्रेत सहभागी झाले.

आपल्या कष्टाचे उद्या चीज होणार, गेले काही दिवस ज्या ओढीने आपण हे शारीरिक तप आचरिले आहे त्याची इतिश्री होणार, उद्या समर्थांचे दर्शन होणार या आनंदातच मंडळी झोपी गेली.

(१३) दि.०७/०२/२०१९, गुरुवार = परळी ते सज्जनगड, ता. सातारा.

अंतर ०८ किमी / मुक्काम : भक्तनिवास, श्रीरामदास स्वामी संस्थान, सज्जनगड.

सर्वत्र मोकळे मैदान, धरणाच्या बाजूची जागा त्यामुळे काल सायंकाळ पासूनच थंडी जाणवत होती. वाटले होते मंडळी आज तरी थोडं उशिरा उठतील. पण कसचे काय ! पहाटे ०५ वाजे पर्यंत बहुतेक साऱ्यांचेच आवरून झाले होते. साऱ्यांनाच समर्थांच्या दर्शनाची तीव्र ओढ लागली होती. आपली आन्हिकं पूर्ण करून मंडळी प्रातःकालीन प्रार्थनेला जमली. नंतर भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा रंगला. आज जरा जास्तच रंगला ! उद्या पासून या आनंद सोहळ्याला आपण मुकणार याच्या विषन्नतेची छटा प्रत्येकाच्या डोळ्यातून स्रवत होती. त्यामुळे प्रत्येकजण बेफाम होऊन नाचत होता. नाचून नाचून थकल्यावर दिंडी मार्गस्त झाली.

परळी गावाच्या वेशीवरच सूर्यनारायणाची प्रार्थना झाली. गेले काही दिवस म्हणण्याचा परिणाम म्हणून आता ही प्रार्थना बऱ्याच जणांना पाठ झाली होती. “केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे” या समर्थ वाचनाची प्रचिती आली. सातत्याला आम्ही कमी पडतो. आळस झटकून, चांगली गोष्ट करण्यास प्रवृत्त होऊन सातत्य टिकवू शकलो तर सर्व काही शक्य आहे, हीहि शिकवण पदयात्रेने दिली.

आज सगळा रस्ता चढा होता. जितका रस्ता चढा होता, तितकाच मंडळींचा उत्साहहि चढाच होता. रामनामाचा, संतांचा जयघोष करीत मंडळी गड चढू लागली. बरेच पुढे गेल्यावर मागाहून आ.वसू ताईंची गाडी आली. गाडीतून त्या खाली उतरल्या. सगळ्यांनी त्यांच्या भोवती कोंडाळे केले. नामघोष केला. त्यांच्या सोबत छायाचित्रे घेऊ देण्याची विंनती केली. त्यांनीहि सगळ्यांची विंनती सानंद मान्य केली. पुरुष भाविकांच्या गटासोबत, महिला भाविकांच्या गटासोबत स्वतंत्र छायाचित्रे काढू दिली.

सकाळी निघताना आम्हाला न्याहरी सोबतच दिली होती. छान जागा पाहून मंडळींनी न्याहरी करून घेतली. गड चढून जाईपर्यंत पाण्याची काही सोय नसल्याने व्यवस्थापक मंडळींनी सर्व पदयात्रींना पाण्याच्या बाटल्या पुरविल्या.

पदयात्रेत एकूण ०८ भगवे ध्वज होते. आलटून पालटून प्रत्येकजण ध्वज घेण्याचे काम करायचा. या संदर्भात एक उल्लेख आवर्जून करणे आवश्यक आहे. श्री.सुदाम टेकाळे व श्री.होनाजी पालदेवाड यांनी सर्व पदयात्रेत मुक्काम ते मुक्काम असे पूर्णवेळ ध्वज खांद्यावर वाहून नेला.

जसा जसा गड जवळ येऊ लागला तसा तसा भक्तीचा उन्मेष टिपेला पोहंचत होता, पदयात्रींच्या उत्साहाला उधाण आले होते. भगव्या पताका नाचवत, रामनामाचा, संतांचा जयघोष करीत हा हा म्हणता गड सर होऊ लागला. आजच्या रात्रीच्या मुक्कामापुरतेच साहित्य सोबत घेऊन वाहनतळापासून स्वतः वाहून न्यायचे व इतर सर्व सामान गाडीतच ठेवायचे, अशा सूचना सर्वांना कालच दिल्या होत्या. त्याप्रमाणे सामानाची विभागणी केल्यामुळे सर्वांना गडावर कमी सामान वाहून नेणे सोयीचे झाले. संयोजकांना किती बारीक-सारीक गोष्टींचे नियोजन करावे लागते, याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेतच होतो, त्याचाच यातून प्रत्यय आला.

शिवाजी महाद्वार, समर्थ महाद्वार असे एकेक करीत गड चढून जाताना धन्यतेची भावना उरात दाटत होती. लोकमान्य टिळक स्मृती कमानीजवळ आल्यावर तर गेले १०/१२ दिवस घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याची भावना झाली. कधी एकदा समर्थांच्या समाधीपुढे लोळण घेतो असे सर्वांनाच झाले होते. पण घाई न करता, आधी आमची दिंडी मंदिराच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर स्थिरावली. तिथे सांगतेचे अभंग म्हणण्यात आले. पू.दादा व पू.अप्पा यांच्या जयघोषासोबत सर्व संतांचा जयघोष करण्यात आला. “होतो जयजयकार गर्जत अम्बर, मातले हे ‘रामदासी’वीर रे” अशी अवस्था झाली होती. “वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणी जाती” प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत होते. उराउरी भेटत होते.

शुचिर्भूत होऊन त्या भारावलेल्या अवस्थेतच सर्वांनी समर्थांच्या समाधीकडे धाव घेतली. “ठाणमाण अति सुंदर मूर्ती, चापबाण झळके शुभ हाती l आननी मधुर हास्य विराजे, भक्त वत्सल उभे रघुराजे ll” आधी रामरायाचे दर्शन घेतले. नंतर अधीरतेने पावले समर्थांच्या समाधीकडे जाऊ लागली. समाधीपुढे येताच सगळ्यांनी लोटांगण घातले व आपली ही पदयात्रा समर्थांच्या चरणी अर्पण केली. “रामदास माय माझी, पतितपावना” या मंदिरात पू. अप्पा दर्शन घेत असताना त्यांच्या दिव्यचक्षूंना नक्कीच समर्थ प्रत्यक्ष दिसले असतील. आमची तेव्हढी पात्रता नाही. पण ते दृश्य चर्मचक्षु पुढे आणून, पू.अप्पांनी जो दिव्यानंद अनुभवला तो कसा असेल याची पुसटशी कल्पना करण्याचा प्रयत्न करू लागलो. तो अनुभव येणे शक्य नाही, पण स्थान तर तेच आहे ना ! “हेहि नसे थोडके” या न्यायाने “तुम्हातील असा मिळो लव तरी जिव्हाळा आम्हा…” अशी पू.अप्पांच्या चरणी याचना केली. काही वेळ तिथे बसून सर्वांनी शांततेत पाठ केला. डोळे भरून समाधीचे दर्शन घेतले. ज्या एका श्लोकात समर्थांचे अवघे चरित्र डोळयांपुढे येते असा पू.अप्पांनी समर्थांवर रचलेला श्लोक आठवला. तो असा –

सोडा धीर न, देव मागुति उभा, धर्मास नाही भय l

व्हावे उद्धट उद्धटासह रणी, हाची यशाचा नय l

ऐसे बोधून ओतिले नव पुनः, चैतन्य राष्ट्रांतरी l

त्या श्रीसद्गुरू रामदास चरणां, मी वंदितो आदरी ll

तेथून उठावेसे वाटत नव्हते. “आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलीया l” ही भावना होती. पण भाविकांची गर्दी वाढू लागली. म्हणून बाहेर आलो.

समोरच्या ओसरीवर पदयात्रींना भेटताना अपार आनंद होत होता. आपण सर्वजण गेले १०/१२ दिवस एक कुटुंब म्हणून वावरलो, एकमेकांच्या साथीने अपार आनंद लुटला याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब उमटत होते. एकमेकांचे अभिनंदन व आभार मानणे सुरु होते. चुकून-अजाणतेपणे मन दुखावल्या गेले असल्यास, त्यासाठी क्षमा याचनाहि झाली. एकमेकांच्या सहकार्यानेच ही पदयात्रा पूर्णतेस पोहंचली आहे, याची सर्वांनाच जाणीव होती. ती प्रत्येकाच्या वाणीतून, कृतीतून व्यक्त होत होती.

नंतर संस्थानच्या वतीने दिलेला भोजनप्रसाद सर्वांनी घेतला. विश्रांतीपश्च्यात भोजनकक्षाच्या वरील हॉलमध्ये पदयात्री दुपारी ०३ वाजता पारायणासाठी जमले. आज फक्त एकच समास वाचायचा होता. तो वाचून पारायण समाप्ती करण्यात आली. यावेळी आ.वसु ताईंचा कंठ दाटून आला होता. शब्द फुटत नव्हते. तशीच काहीशी सर्वांचीच अवस्था झाली होती. सर्वांच्या वतीने श्री. व सौ. उमरीकर यांनी ग्रंथाचे पूजन व आरती केली. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. परायणानंतर लगेचच पाठ घेण्यात आला. नंतर चहापानाची सुटी झाली. ०४३० वाजता कीर्तन झाले. आजचे कीर्तन श्री.विक्रम नांदेडकर यांनी केले. त्यांनी आज संत श्रीसखूबाईचे आख्यान सांगितले. संवादिनीच्या साथीला श्री.रावसाहेब सावंत होतेच. श्री.विक्रम यांचे आजचेहि कीर्तन छान झाले. मोठा कथाभाग असूनहि नेमून दिलेल्या वेळेत सर्व कथाभाग त्यांनी प्रभावीपणे सांगितला.

आज श्री.विक्रम यांनी त्यांचे सामान स्वतः वाहून जुन्या वहिवाटीच्या पायऱ्यांच्या मार्गाने चढून गडावर आणले. त्यांच्या शारीरिक क्षमतेचे कौतुक आहे. या संपूर्ण पदयात्रेत श्री.विक्रम यांचा आश्वासक वावर होता. त्यांनी पदयात्रेत एकूण ०५ कीर्तने केली. सर्वच कीर्तने उत्तमरीतीने सादर केली. त्यांची विवेचन शैलीहि मनाचा ठाव घेते. नियोजन, व्यवस्थापन व यशस्वी अंमलबाजवणी यातहि त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. उत्तोरोत्तर त्यांची या अंगाने प्रगती होत राहो व त्यांच्याकडून अशीच सेवा घडत राहो हीच सदिच्छा !

कीर्तनानंतर काही मंडळी समर्थांच्या मंदिरात होणाऱ्या सायंकाळच्या उपासनेला हजर राहिली तर काही जण धाब्याचा मारुती, आंग्लाई देवीच्या दर्शनाला गेले. आंग्लाई देवीच्या समोर महिला भाविकांनी जोगवा मागितला. त्यांनी जोगव्यातून स्वतःचे, स्वतःच्या परिवाराचे, श्रीदासगणू परिवाराचे, हिंदू समाजाचे व भारताच्या सौख्याचे दान देवीकडे मागितले. एकमेकांची ओटी भरून जोगव्याचा कार्यक्रम संपन्न केला.

महदाश्चर्याची बाब म्हणजे पंढरपूरातून आमच्या सोबत आलेले पुण्यवंत “गंग्या”चे वंशज असलेले दोन पुण्यवंत श्वान गडावरहि पोचले होते. पण बहुतेक त्यांना उद्याच्या विरहाची चाहूल लागली असावी, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा स्पष्टपणे जाणवत होती व ते श्री.विक्रमदादाच्या सतत अवती-भवती घोटाळू लागले. त्यांच्या हा लाघवीपणा व पंढरपूरातून आमच्या सोबत गडापर्यंत येणे, हा सर्वांच्या चर्चेतील कुतूहलाचा विषय झाला होता.

आजहि बाहेर गावाहून बरेच भाविक पदयात्रेचा सांगता सोहळा अनुभवण्यासाठी आले होते. रात्री ०८ वाजता जेवणं करून मंडळी आपापल्या खोल्यात परतली. संस्थानच्या भक्तनिवासातील खोल्यात व मोठ्या हॉल मध्ये आज सर्वांच्या निवासाची व्यवस्था केली होती.

(१४) कन्या सासुऱ्यासीं जाय l मागे परतोनी पाहे ll

दि.०८/०२/२०१९, शुक्रवार = सज्जनगड, ता. व जि. सातारा.

इतके दिवस थंडीने आम्हाला बेजार करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला पण आमच्या मंडळींनी तिची डाळ काही शिजू दिली नाही. त्यामुळे रागावलेल्या थंडीने आज पाण्याने भरलेल्या धरणाचा शेजार अन् गडावरचे तुफान वारे यांच्या मदतीने आम्हाला पुरते बेजार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण हाय रे ! तोहि व्यर्थच गेला. मंडळींच्या मनात असलेल्या उर्मीने त्यांच्या अंगात इतकी गर्मी निर्माण केली की, मंडळी स्नानादी कार्यक्रम उरकून पहाटे ०४३० च्या काकड आरतीला समर्थांपुढे सादर झाली. गाभाऱ्यात जास्त गर्दी नसल्याने तिथे बसून पाठ, जपजाप्य केले. आज गोरट्यातील नित्याच्या वेळेला म्हणजे ०७३० वाजता सकाळ्ची प्रार्थना होणार होती. या गडावरून गडाच्या चारहि दिशेला वेगवेगळी व सुंदर दृश्ये दिसतात. मंडळींनी त्या नयनरम्य दृश्यांना मनाच्या कप्प्यात साठवत, निसर्गाचा आस्वाद घेत, गडावर फेरफटका मारून प्रार्थनेसाठी हजेरी लावली.

आम्ही दोघे मात्र सोवळ्यात समर्थांच्या समाधीपुढे येऊन बसलो. पूर्वी सोवळ्यात समर्थांच्या समाधी पर्यंत जाता येत होते. समाधीच्या मुख्य गाभाऱ्यात आता फक्त गडावर सेवेसाठी असलेल्या रामदासींना व तेहि सोवळ्यात असतील तरच प्रवेश आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी समाधीपुढील दरवाज्यात ठाण मांडले. ठरलेल्या वेळी ब्रह्मवृंद आला व त्यांनी षोडशोपचार अभिषेकाला प्रारंभ केला. यावेळी मूळ समाधीचे दर्शन आम्हाला घडले. (अभिषेकानंतर मूळ समाधी वस्त्रांनी झाकलेली असते.) समंत्रक एकेक उपचार सुरु झाले. जगभरात जिथे कुठे मराठी माणूस आहे, तो गणेशाची आरती करताना समर्थ रचित आरती म्हणतो. त्या आरतीच्या रचयित्याच्या अभिषेकावेळी श्रीगणेशाच्या घडीव पितळी मूर्तीलाहि अभिषेक घातला जातो. आज नेमकी श्रीगणेश जयंती ! या योगायोगाचे मला खूप अप्रूप वाटले.

समाधीचा सर्व षोडशोपचार आभिषेक आम्हाला यथासांग पाहायला मिळाला. यावेळी बाहेर आमचे नामस्मरण सुरु होते. सकाळच्या प्रार्थनेनंतर आमच्या मंडळींसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती. नाश्ता करून बरीच मंडळी गाभाऱ्यात येऊन बसली. अभिषेकानंतर नैवेद्य व आरती झाली. आम्हा सर्वांनाच आरती व प्रसादाचा लाभ झाला. समाधीला प्रत्यक्ष स्पर्श करून पूजा करता आली नाही, तरी तो सर्व विधी पाहत समर्थांची मानस पूजा घडलीच ना ! त्यामुळे “भाग्य आपल्या पूजनाचे l लाधले पूर्व सुकृते साचे l त्यात साफल्य जीवनाचे l लाभून झालो कृतार्थ ll” ही भावना मनी दाटून आली. समर्थांना सर्व पदयात्रींच्या वतीने साष्टांग दंडवत घातला व सर्वांसाठी “हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा l न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा ll” असा आशीर्वाद मागितला व बाहेर आलो.

तोपर्यंत समाधीमंदिराच्या ओसरीवर काल्याच्या कीर्तनाची तयारी झालेली होती. आदरणीय वसू ताई समोरच दिसल्या. लगेचच त्यांच्या चरणावर डोके ठेवले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सद्गुरू सेवेप्रती वाहून घेतले आहे, आमच्यासाठी ज्या ‘सद्गुरू सेवेचा मापदंड’ आहेत, सद्गुरू प्रति निष्ठा कशी असावी, याचा प्रस्तुत काळातील साधकांसाठी ज्या आदर्श आहेत – त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर कृतकृत्यतेच्या ज्या भावना माझ्या मनात उमटल्या त्या शब्दबद्ध करणे अवघड आहे.

या पदयात्रेसाठी त्यांनी किती किती तयारी केली होती बापरे ! रोज परायणात किती समास वाचायचे, कोणाचे कीर्तन कुठे असेल अशा नियोजनापासून कोणत्या दिवशी जेवणात कोणती चटणी असेल, कोणते पदार्थ असतील अशा सर्व नियोजनाची त्यांच्याकडे लिखित यादी तयार होती. गोरट्याहून येताना मेणबत्ती पासून ते पाणी तापविण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या पातेल्यांपर्यंत काय काय घ्यायचे, याची व्यवस्थित योजना करून ते सर्व साहित्य सोबत घेतले होते. आम्ही पदयात्री मुक्कामाच्या ठिकाणी गेलो की सतरंज्या अंथरलेल्या असायच्या, सुग्रास भोजन तयार असायचे, चालताना ठरलेल्या वेळी न्याहारी मिळायची. पण हे सर्व वेळेत सिद्ध होण्यासाठी आ.वसू ताई झटत असायच्या. त्यात त्यांना सर्व सेवेकऱ्यांची व कार्यकर्त्यांची उत्तम साथ मिळत असायची, हे खरेच !

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् l कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ll (९.७)” कल्पांती सर्व जीव मी माझ्यात सामावून घेतो व काल्पारंभी पुन्हा त्यांना बाहेर काढतो, असे सृष्टीच्या निर्मिती संबंधी भाष्य करतांना भगवंत गीतेत म्हणतात. तसा हा काल्पारंभ व कल्पांत आ.वसू ताई व व्यवस्थापक मंडळींसाठी रोज असायचा. मुक्कामाच्या ठिकाणी गेले की टेम्पोमधील एकूण एक सामान काढायचे, मांडायचे, स्वैपाक सिद्ध करायचा, जेवणं – पारायण – कीर्तन हे सर्व करायचे. दुसऱ्या दिवशी सर्व साफसफाई करून पुढच्या मुक्कामाला जाताना सुतळीचा तुकडाहि मागे राहणार नाही याची दक्षता घ्यायची. जबाबदारीचे व अवघड काम पण सहजतेने पूर्ण व्हायचे.

आ.वसू ताई पदयात्रेत आमच्या सोबत पूर्ण वेळ होत्या. त्यामुळे त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. पू. अप्पांच्या आठवणींचा तर भला मोठा खजिनाच त्यांचा जवळ आहे. प्रसंगानुरूप त्या खजिन्यातील एकेक रत्न आम्हाला त्या दाखवायच्या. पदयात्रींची सर्व काळजी त्यांनी वाहिली. प्रत्येकाकडे त्यांचे लक्ष असायचे. प्रत्येकाला काय हवे-नको हे त्या बघायच्या. ज्यांना चालण्याचा किंवा इतर काही व्याधींचा त्रास असायचा त्यांच्याकडे तर त्यांचे विशेष लक्ष असायचे, रोज त्यांची चौकशी करायच्या. आवश्यक तिथे त्या कठोरहि वागतात. पण त्यांचा त्यात लवंशानेहि स्वार्थ नसतो. नियोजित काम यशस्वीरित्या पूर्ण व्हावे व हातात घेतलेली जबाबदारी व्यवस्थित पार पडावी, केवळ हाच उद्देश त्यांच्या (परिस्थितीवश स्वीकारलेल्या) रुद्रावतारामागे असायचा / असतो. आ.वसू ताई सोबत असणार याचा सर्वांना आनंद झाला असे प्रारंभी नमूद केले आहे. तसा तो आनंद का झाला, याचे गमक सर्वांविषयी असणाऱ्या त्यांच्या मातृहृदयव्रत प्रेमळ स्वभावात आहे.

अभिषेक संपन्न करून आम्ही आवरून कीर्तनासाठी मंदिरात येऊन बसलो. “रामदास माय माझी…” हे कीर्तनातील नमनाचे पद म्हणताना श्री.विक्रम यांना वारंवार गहिवरून येत होते. सुरुवातीचे पदं म्हणून झाल्यानंतर विवेचन करताना शब्द फुटत नव्हते. प्रत्यक्ष पू.दासगणू महाराज व पू.अप्पा ज्यांच्या पुढे नतमस्तक होण्यात धन्यता मानतात, त्या समर्थांपुढे उभे राहून कीर्तन सादर करणे – या फार मोठ्या जाबाबदारीची जाणीव व त्यातील काठिण्य लक्षात येऊन मनाच्या झालेल्या घालमेलीमुळे त्यांची ही अवस्था झाली होती. पण ते काही क्षणच ! कारण नवस करूनहि मिळणार नाही, असा हा फार मोठा भाग्याचा क्षण होता. ज्या रामदासी परंपरेचे स्वतः श्री.दासगणू महाराज पाइकत्व अभिमानाने मिरवतात, त्या उज्वल परंपेच्या उद्गात्यासमोर कीर्तन सेवा करायला मिळणे, या परते दुसरा भाग्याचा क्षण तो कोणता ! हा विचार करून त्यांनी नेहमीच्या प्रभाविदार शैलीत भगवंताच्या बाललीलांचे वर्णन करण्यास सुरुवात केली.

तत्पूर्वी पूर्वरंग सांगून झाल्यावर समर्थांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेला, स्वामी वरदानंद भारती यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेणारा ग्रंथ म्हणजे “तेजाचं चांदणं“, याच्या तिसऱ्या आवृत्तीचे समर्थांच्या समोर प्रकाशन करण्यात आले. सर्व समर्थ श्रीरामाचे दास असलेल्या समर्थ रामदास स्वामी यांच्या पुढे गणूदासाच्या समर्थ शिष्याच्या जीवन ग्रंथाचे प्रकाशन झाले, तेव्हा सर्व भाविकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. या ग्रंथाची पहिली प्रत श्री.रामदास स्वामी संस्थानचे व्यवस्थापक श्री.प्रवीण जोशी (रसायन शास्त्र अभियांत्रिकी M.Tech., ICT, मुंबई, मोठ्या कपंनीतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त, सध्या समर्थ सेवेत कार्यरत) यांना भेट देण्यात आली. ज्यांनी या पदयात्रेत मनापासून सहभाग घेतला व सर्व पदयात्रा आनंदाने पूर्ण केली त्या श्री.दत्तात्रय भिडे यांना या ग्रंथाची दुसरी प्रत देण्यात आली. तिचा त्यांनी विनम्रतेने स्वीकार केला. पू.अप्पांचा हा मला मिळालेला आशीर्वाद असून माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे, या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना कीर्तनानंतर माझ्याकडे व्यक्त केल्या.

काल्याच्या कीर्तनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध खेळ ! सर्वांनाच त्या खेळांची प्रतीक्षा होती. प्रत्येक पदयात्रीला खेळ खेळायचे होते. भाविकांनी मागे सरत मध्यभागी खेळण्यासाठी जागा तयार केली. श्री.विक्रम खेळण्यासाठी पुढे झाले. त्यानंतर जे घडले ते पाहून विश्वासच बसेना ! स्वतः आ.वसू ताई पदर खोचून फुगडी खेळाण्यास पुढे आल्या. त्यांनी व विक्रमदादा दोघांनी मिळून फुगडी खेळली. हा दुर्मिळोत्तम क्षण प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये टिपला. स्वतः वसू ताई खेळलेल्या पाहून श्री. व सौ. उमरीकर पुढे सरसावले. गेले काही दिवस त्यांनी पदयात्रेत चालताना खेळ खेळून आनंद लुटला होताच; आज त्याची पुनरावृत्ती केली. चालून आलेल्या संधीचे या उभयंत्यांनी सोने केले. रणघोडा खेळणे अवघड आहे. तरी साठीच्या जवळ पोचलेल्या श्री.शंभू सावकार कवटीकवार व श्री.अशोकराव कुलकर्णी यांचा उत्साह इतका दांडगा की त्यांनी तरुणांना लाजवेल असा रणघोडा खेळला. स्वतः वसू ताई खेळलेल्या पाहून कु.विमलताई व कु.सविता यांनीहि पिंगा खेळण्याचा आनंद लुटला. इतरहि भाविकांनी इतर खेळ खेळून या खेळ खेळण्याच्या प्रसादचे ग्रहण केले. काल्याची दहीहंडी श्री.प्रवीण जोशी यांच्या हस्ते फोडण्यात आली. सर्वांना प्रसाद वाटण्यात आला व “तद्सत्श्रीकृष्णार्पणमस्तु” या भावनेने झालेली सर्व सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यात आली.

कीर्तनानंतर सर्वांनी समर्थांचे दर्शन घेतले व त्यानंतर आ.वसू ताईंसोबत स्वतःचे छायाचित्र काढून घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. जो तो त्यांच्या सोबत एकट्याने, समूहाने छायाचित्र घेऊन पदयात्रेच्या सांगतेचा तो क्षण कायम स्वरूपी चित्रबद्ध करू इच्छित होता. त्यांनी सर्वांची हीहि इच्छा पूर्ण केली. अजून भोजनप्रसादाला अवकाश होता. तेवढ्या वेळेत मंडळींनी आपले सामान आवरून घेतले. नंतर नेहमीप्रमाणे चढाओढीने श्लोक म्हणत सर्वांनी भोजनप्रसाद ग्रहण केला. या वेळी श्री.भिडे काकांनी समर्थांवर एक सुंदर श्लोक म्हणला. तो मला फारच आवडला. पू.अप्पांच्या काव्यशैलीशी साधर्म्य त्यात मला जाणवले. नंतर तो श्लोक मी मुद्दामहून त्यांच्या कडून लिहून घेतला. प्रस्तुतच्या श्लोकातूनहि समर्थांचे चरित्र डोळ्यापुढे उभे राहते. तो श्लोक असा –

जागे होऊनि, त्यागुनी स्वसुख जे, सुमुहूर्त साधोनियां l

आत्माराम प्रसन्न घेती करोनि, दासासी बोधावया l

करिती जागृत राष्ट्र – व्यक्ती सकळां, कल्याण साधावया l

त्या श्री सद्गुरू रामदास चरणा, अत्यादरे वंदु या ll

विद्यमान काळातील एक आदरणीय व्यक्तिमत्व डॉ. श्री. सुहास पेठे (सातारा) यांनी हा सुंदर श्लोक रचला आहे. डॉ.पेठे हे अध्यात्मिक तत्वज्ञानाचे मोठे अभ्यासक व प्रचारक असून त्यांची ग्रंथसंपदाहि मोठी आहे. त्यांना पू. अप्पांच्या बद्दल नितांत आदर आहे. साताऱ्याहून गोरट्याला जाताना आ.वसू ताईंनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती.

गेले १४ दिवसात (मागचा एक, पुढचा एक असे दोन व प्रत्यक्ष चालण्याचे १२ दिवस) एकूण १६७ किमी अंतर पदयात्री पायाने चालले. पायी चालताना एकदा पंढरपूर सोडल्या नंतर पदयात्री या उपक्रमाशी इतके एकरूप झाले की त्यांचे तारीख, वार याचे भान सुटले. उठायचे – आवरायचे – चालायचे – भोजन – विश्रांती – पारायण – कीर्तन – पाठ व पुन्हा विश्रांती असा ठरलेला कार्यक्रम असायचा. काही बदल न होता, इतर सर्व जश्याला तसे, केवळ मुक्कामाची ठिकाणं बदलायची ! आ.वसू ताईंचे उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मंडळाने पदयात्रींची इतकी काळजी घेतली की, निवास – भोजन याची यत्किंचितहि काळजी पदयात्रींना कधीच करावी लागली नाही. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. महेशअण्णा व श्री. विनायकराव यांचे पदयात्रेच्या सर्व घडामोडींवर कायम लक्ष असायचे. (प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्री. महेश अण्णा पदयात्रेत सहभाग नोंदवू शकले नाही. ज्यांना ज्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल कळले, त्या प्रत्येकाने त्यांना शीघ्रगतीने उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली.) प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्तहि वेळोवेळी पदयात्रेच्या प्रगतीची चौकशी करायचे. श्रीदासगणू परिवारातील प्रत्येक सदस्य या पदयात्रेशी मनाने जोडलेला होता. संपर्काच्या विविध माध्यमातून त्या सर्वांच्या शुभेच्छा (व या आनंद सोहळ्यात सहभागी होऊ न शकल्याचे शल्य !) पदयात्रींना सदैव मिळत होत्या. पदयात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे हजारो हात राबले होते. बऱ्याच अनामिक प्रयोजकांचेहि उत्तम सहकार्य लाभले. पदयात्रेचा हा गोवर्धन पर्वत अनेकांनी त्यांच्या प्रत्यक्ष मेहनत, आर्थिक सहकार्य व अन्य स्वरूपातील काठ्यांनी तोलून धरला होता. तथापि त्या प्रत्येकाच्या मनात एक भावना कायम दृढ होती की, आम्ही सर्व निमित्तमात्र असून पू. अप्पांनीच हा गोवर्धन पर्वत आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या बळावर केवळ करांगुलीवर सहज लीलेने तोलून धरला आहे. या सर्वांची मूळ प्रेरणा सद्गुरू पू.अप्पा आहेत. हे सर्व दिव्य ऐश्वर्य पू. अप्पांचे आहे, पू. अप्पांमुळे आहे व पू. अप्पांसाठीच आहे !

एकमेकांचा निरोप घेताना मंडळींना खूप जड जात होते. गेले १०/१२ दिवस एकोप्याने सोबत राहिलो, एकमेकांच्या सोबतीने आनंद लुटला होता. त्यामुळे एकमेकांना उराउरी भेटताना भावना आवरणे कठीण जात होते. “श्रीवरद नारायण – श्रीदासगणू महाराज – पू.अप्पा” यांच्या कृपाशीर्वादाने आयुष्यभरासाठी पुरतील अशा ‘अनंत’ सुखद आठवणींच्या अमर्याद संपदेचे अमूल्य ‘वरदान’ आम्हा ‘दासांच्या’ झोळीत टाकून ही पदयात्रा संपन्न झाली.

समर्थांचे निरोपाचे दर्शन घेताना प्रत्येकजण हे मागत होता की, आमच्या हातून पू.अप्पांची कायम सेवा घडावी व तुमच्या कृपेने या पदयात्रेत जो अव्यक्त, अद्भुत आनंद आम्ही अनुभवला तो आनंद आयुष्यात अक्षयी टिकून राहावा व सर्व काळी, सर्व ठिकाणी त्याचा प्रत्यय वारंवार यावा !

!! इति शम् !!

ll पुंडलीकवरदा हरि विठ्ठल ll
ll सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय ll
ll सद्गुरू दासगणू महाराज की जय ll
ll स्वामी वरदानंद महाराज की जय ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
ll नमः पार्वतीपते हर हर महादेव ll
ll भारत माता की जय ll

ॐ शांति: पुष्टी: तुष्टी: च अस्तु !

शब्दांकन : अरुण परळीकर, पुणे.

फाल्गुन शुद्ध १२,१९४०, सोमवार, दि.१८/०३/२०१९

(तृतीय गोदापरिक्रमा पूर्ती स्मरण दिवस)