ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

(३) दि.२८/०१/२०१९, सोमवार = उपरी ते तांदुळवाडी, ता.माळशिरस.

अंतर १५ किमी / मुक्काम : सगुणा मंगल कार्यालय, तांदुळवाडी.

कडाक्याची थंडी असूनहि भल्या पहाटे ०३ वाजल्या पासूनच मंडळींची प्रातर्विधीसाठी गडबड सुरु झाली. उपरीच्या शाळेत शौचकूपाची अडचण होती; तथापि फिरते शौचकूप सोबत असल्याने महिलांसाठी ती अडचण काही अंशाने उणावली. पण आता मंडळींचे या गैरसोयींकडे दुर्लक्ष होऊन, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याकडे कल वाढू लागला. कारण पदयात्रेतील सर्व सज्जन आता “चलो सज्जनगड” या एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन ते गाठण्यासाठी सज्ज झाले होते. त्यामुळे जसे असेल तसे पटापट आवरून मंडळी स्वतःचे सकाळचे आन्हिकं करू लागली. कोणी व्यायाम करीत असे तर कोणी योगासने करीत असे. इतर काही मंडळी शुचिर्भूत होऊन काही ना काही साधना करीत असत. कोणी संध्या, कोणी जप, कोणी पोथीवाचन, कोणी स्तोत्र पठण, कोणी शांतपणे पाठ करीत “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” या समर्थोक्तीचे अवलंबन करू लागला.

ठीक ०६ वाजता प्रातःकालीन प्रार्थना होऊन दिंडी मार्गस्त होण्यास सिद्ध झाली. नमनाचे अभंग, भजनाच्या गजरात व नामघोषात पावलीचा सोहळा झाला. सर्व पदयात्री याचा आनंद घेऊ लागले. नंतर भजनानंदात आमचे मार्गक्रमण सुरु असताना काही काळानंतर पूर्व दिशेला रविकिरणांची दाटी होऊन सूर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल लागली. काही भाविक पूर्वेकडे तोंड करून मनोभावे सूर्यदेवतेला वंदन करू लागले. पू.अप्पांनी सूर्यनारायणाची सुंदर प्रार्थना रचली आहे. माझ्या मनात आले की सर्वांनी मिळून ती प्रार्थना म्हणावी. माझ्या जवळ ती प्रार्थना होतीच. मी लगेचच सर्वांना एकत्र एकाठिकाणी थांबण्याचे आवाहन केले. सर्वांनी त्यास प्रतिसाद दिला. मी माझ्या जवळील त्या प्रार्थनेचे पत्रक काढले व आदरणीय जेष्ठ गुरुबंधू श्री.बाबा काचरे (वय ७९) यांना ती प्रार्थना म्हणण्याची विनंती केली. त्या प्रार्थनेच्या श्लोकातील एक एक ओळ खड्या आवाजात ते म्हणू लागले व त्यांच्या मागे आम्ही सर्वजण एक स्वरात समूहाने ती प्रार्थना म्हणू लागलो.

नारायणा सकल लोकपते गभस्ती l भावे प्रणाम करतो तुजला प्रभाती l

अज्ञान, मोह हृदयातील दूर सारी l बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी ll

आम्हा पदयात्रीं व्यतिरिक्त त्या रस्त्यावर कोणी नाही, सर्वत्र कोमल शांतता, थंडीमुळे असलेला वातावरणातील सुखद गारवा, पक्षी आकाशात स्वछंद विहार करीत आहेत, मंद मंद शीतल वारे वाहत आहेत, अशा आल्हाददायक वातावरणात सर्व आसमंत केशरी रंगाने उजळून टाकणारा तो तेजोनिधी – तेजोगोल मंद व आश्वासक गतीने क्षितिजावर आपल्या सहस्र किरणांनी तमाचा विनाश करीत हळू हळू उगवतो आहे, त्याच्या आगमनाने समस्त चराचरामधे चैतन्य संचारत आहे व आम्ही सर्वजण पू.अप्पांनी रचलेल्या स्तवनाने त्या गगनराज भास्कराचे मंगलमय स्वागत करीत आहोत. आ हा हा….! काय सुंदर तो प्रसंग ! त्या मंगल प्रसंगी पू.अप्पांनी रचलेल्या त्या स्तवनातील प्रत्येक शब्दाची समर्पकता प्रत्ययास येत होती. पू.अप्पांनी या प्रार्थनेचा समारोप करताना सूर्यनारायणकडे जी याचना केली, तीहि किती व्यापक आहे. ते म्हणतात –

देवा समृद्ध, विजयी करी भारतास l सन्मार्ग दाखिव विभो सगळ्या जनास l

मोहामधून नित नम्र अनंत तारी l बुद्धी प्रकाशित करी आमुची तमारी ll

सूर्यनारायणाची प्रार्थना व मनोभावे प्रणाम करून आमची दिंडी पुन्हा आपला मार्ग क्रमण्यास सिद्ध झाली. आणि यापुढे सूर्योदयाच्या वेळी दररोज ही प्रार्थना म्हणण्याचा प्रघात सुरु झाला.

पुढे काही चालून झाल्यावर न्याहरीसाठी अजून वेळ होता; आमची दिंडी रस्त्याच्या कडेला विसावली होती. सर्वजण गोल रिंगण करून भजन करीत होते. तेव्हा मी माझ्या सौभाग्यवतीला (सौ.तनुजा) घेऊन भजनाच्या तालावर फुगडी खेळलो आणि मग काय विचारता, आमच्या दिंडीत चैतन्यच अवतरले ! प्रत्येकजन जोडीजोडीने फुगडी खेळू लागला. थोडे अंतर चालून गेल्यावर श्रीरेणुका मातेचे एक छोटे पण प्रशस्त आवार असलेले मंदिर लागले. तिथे सर्वांनी न्याहरी घेतली. न्याहरी नंतर सौ.मीराताई जोशी यांनी मोठ्या ठसक्यात एक भारूड सादर केले. सर्वांनी त्याला खूप छान संगत केली व उत्तम प्रतिसाद दिला. नंतर विविध खेळ खेळायला सुरुवात झाली. जणू गोपाळकाल्याचे कीर्तन तिथे चालू आहे की काय असे वाटत होते. काल्याच्या कीर्तनांत महिलांना खेळ खेळण्यास मिळत नाही. ती सर्व उणीव महिला वर्गाने येथे भरून काढली. पुरुष-पुरुषांची जोडी, महिला-महिलेची जोडी, पती-पत्नीची जोडी अश्या जोड्या जमवून जो तो एकमेकाला खेळ खेळण्यास उद्युक्त करू लागला. जवळपास प्रत्येकाने मनसोक्त खेळ खेळायचा आनंद लुटला.

फुगडी, हातकोपर, हमामा, पिंगा हे सर्व खेळ खेळून झाले. आता ‘रणघोडा’ राहिला. खाली मातीचे मैदान होते त्यामुळे मातीत रणघोडा कसा काय खेळावा, या संमभ्रमात सर्वच होते. मी पुढे झालो व पद्मासन घालून बसलो. वयाची साठी पार केलेले श्री.मधुकाका कोकलेगावकर (वय ६३) लगेचच पुढे सरसावले व आम्ही दोघांनी मिळून त्या मातीत मनसोक्तपणे रणघोडा खेळाला. सर्वांनी मनापासून “राधाकृष्ण जय कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी” चा ताल धरला. खूपच मजा आली. त्यानंतर पुढे झाले असे की, जागा मिळेल तिथे रणघोडा खेळण्यासाठी चढाओढ सुरु झाली. आता पदयात्रींच्या चालण्यातील थकवा दूर पळाला व असे वाटू लागले की मुक्कामाचे ठिकाण येऊच नये, इतका आनंद पदयात्री चालताना लुटू लागले.

आनंदाचे डोही आनंद तरंग” असा अपूर्व आनंद लुटत, मार्गक्रमण करीत मंडळी तांदुळवाडीच्या सगुणा मंगलकार्यालयात १२३० वाजता पोहचली. ही जागा उत्तम होती. येथे पाणीहि मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे मंडळींनी तिथे मोठ्या प्रमाणात कपडे धुवून घेतले. ठरलेल्या वेळी सुग्रास भोजन, दासबोध पारायण, विश्रांती, चहापान, कीर्तन, रात्रीचा अल्पोपहार व पाठ झाला. आज श्री.विक्रम यांनी पू.अप्पांच्या जीवन चरित्रावर आधारित आख्यान सांगितले. पू.अप्पांचा जन्म, शिक्षण, नौकरी, गुरु परंपरा सांभाळणे व ती.दादांचे निर्याण या प्रसंगांचे वर्णन या आख्यानात होते. कीर्तन खूप छान झाले. सद्गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने चालताना सद्गुरूंची कीर्ती कानावर पडणे – हा आम्हा सर्वांसाठी श्रवणामृतयोग होता.

गुरुबंधुंना भेटताना त्यांच्या हातचा प्रेमळ स्पर्श हातांना सुखावत होता, गुरुबंधूंना व गुरुभगिनींना पदयात्रेतील आनंदाचा आस्वाद घेताना डोळे पाहत होते, दासबोधामृत – भजनामृत – कीर्तनातून सद्गुरूंची कीर्ती यांचे कानास अमृतपान होत होते, सुग्रास भोजनाचा आस्वाद रसना घेत होती व त्या सुग्रास अन्नाचा सुगंध नासिकेस सुखावत होता. पंचेंद्रियांना मिळणाऱ्या या लौकिक सुखामुळे मन, बुद्धी व आत्मा अलौकिक अशा अतींद्रिय तृप्ततेचा अनुभव घेत होते. दिवसभरात लुटलेल्या पंचेंद्रियांच्या या परम सुखाची उजळणी करत मंडळी पडली असता झोप कधी लागली हे त्यांचे त्यांनाहि कळले नाही.

(४) दि.२९/०१/२०१९, मंगळवार = तांदुळवाडी ते पिलीव ता.माळशिरस.

अंतर १३ किमी / मुक्काम : शासकीय विश्रामगृह व सांस्कृतिक भवन, पिलीव.

ठीक ०६ वाजता प्रातःकालीन प्रार्थना होऊन दिंडी मार्गस्त होण्यास सिद्ध झाली. नमनाचे अभंग, नामघोषात पावलीचा सोहळा झाला. थोडे पुढे गेल्यावर सूर्य नारायणाची प्रार्थना झाली. संतांचे अभंग / भजनं गात दिंडी चालू लागली. भजनकरी मंडळी मनापासून अभंगांचे गायन करायचे. त्यामुळे दिंडी सोबत चालताना एक वेगळाच आनंद मिळायचा. हा आनंद घेण्यासाठी बहुतेक सर्व पदयात्री दिंडी सोबत राहण्याचा प्रयत्न करू लागली. विशेषतः गोरट्यातील महिला व पुरुष दिंडी सोबतच चालायचे. दिंडी मध्ये श्री.रावसाहेब सावंत हे मुख्य वीणाधारी होते. श्री.गंगाधर सिंगेवाड, श्री.देविदास मजरे, श्री.संजय सावंत या तिघांनी संपूर्ण पदयात्रेत मृदंग वादनाची जबाबदारी सांभाळली. मृदंग वाजवून यांच्या बोटांना भेगा पडल्या होत्या – बरेच वेळा रक्तहि यायचे, तेव्हा त्यांनी या भेगांना बँडएडच्या पट्टया लावल्या पण मृदंग वादनाची जबाबदारी सोडली नाही. त्यांच्या या निष्ठेला मनापासून प्रणाम ! या चौघांसह श्री.शंकर सावंत, श्री.कोंडीबा सावंत, श्री.आनंदा सावंत, श्री.हनुमान गंगोत्री, श्री.नागनाथ पालदेवाड, श्री.बालाजी पालदेवाड, श्री.बाबुराव सावंत, श्री.अजय भरकड, श्री.दत्ताराम शिंदे, श्री.गणेश फुलारी, सौ.गोदावरीबाई दांगट, सौ.रुक्मिणीबाई (पाटील) सावंत, सौ.लक्ष्मीबाई (पाटील) सावंत या सर्वांनी संपूर्ण पदयात्रेमध्ये अभंग गायनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. ही मंडळी रोज वेगवेगळे अभंग म्हणायची. या सर्वांच्या पाठांतराचीहि कमाल आहे. (सौ.रुक्मिणीबाई (पाटील) सावंत या तर दररोज रात्री पू.दादा व पू.अप्पा यांच्यावर गाणी रचून दुसऱ्या दिवशी आम्हाला गाऊन दाखवायच्या. त्यांचा आवाजहि उत्तम आहे.) सतत गायन करून घसा बसायचा तेव्हा रात्री गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा साफ करून घ्यायचे, सोबत गूळ ठेवायचे पण भजन गायन सोडले नाही. या सर्वांच्या मेहनतीमुळे पदयात्रेत सहभागी झालेल्या मंडळींना भजनाचा अमर्याद आनंद उपभोगता आला. या सर्वांचे आम्ही सर्व पदयात्री मनापासून ऋणी आहोत.

कालच्या खेळांच्या प्रसंगांमुळे भाविकांच्या मनाची भीड हळू हळू कमी होऊ लागली. महिला भाविकहि स्वतः होऊन गाणी, भजनं, भारुडं, गवळणी म्हणू लागल्या. त्यातहि सौ.मीराताई जोशी, सौ.साधनाताई उमरीकर, सौ.वैशालीताई नांदेडकर यांच्या गवळणी – भारुडांनी पदयात्रेत बहार आणली. सुरुवातीला गोरट्याच्या महिला पुढे येऊन काही म्हणण्यास लाजायच्या, नको-नको करायच्या. या महिलांचा सक्रिय सहभाग पाहून त्याहि धीटपणे पुढे येऊन भजनं म्हणू लागल्या. यामुळे ग्रामीण-शहरी हा भेद गळून पडला. पुढे नंतर शिक्षित-अडाणी, गरीब-श्रीमंत हेहि भेद विरघळून गेले, पदयात्रेत सुसंस्कृत एकसंघपणा वाढला. प्रत्येकजण अगदी आत्मीयतेने एकमेकांची काळजी वाहू लागला. गुरुबंधु-गुरुभगिनी हे नाते होतेच, त्या नात्यात आता अजून ओलावा / जवळीक निर्माण झाली.

काल अंतर जास्त असूनहि मंडळी १२३० वाजताच मुक्कामाच्या ठिकाणी पोहंचली होती. पदयात्री मुक्कामाच्या ठिकाणी लवकर आली की तेथील व्यवस्थेवर ताण पडतो. कालच्यापेक्षा आजचे अंतर कमी असल्याने पदयात्रींनी दुपारी १२ च्या आत मुक्कामाच्या ठिकाणी येऊ नये अशी सूचनाच आ.वसू ताईंनी दिली होती अन् मंडळी आता चालायला बऱ्यापैकी सरावल्यामुळे ११ वाजताच पिलीव गावात पोहंचली होती. तेव्हा रस्त्याच्या कडेला मोठे आंगण व सावली असलेले एक छानसे घर दिसले. ते घर श्री.दत्तूसिंग बाळूसिंग भैस (विमा प्रतिनिधी) यांचे होते. आमची दिंडी असून काही वेळ येथे बसून भजने म्हणली तर चालेल का ? अशी चौकशी त्यांना केली. घरातील मंडळी सात्विक प्रवृत्तीची होती. त्यांनी सहर्ष अनुमती दिली. सर्व भजनी मंडळ व पदयात्री गोल रिंगण करून बसली व तिथे भजने, गवळणी म्हणायचा कार्यक्रम रंगला. आमचे इकडे भगवंताच्या गुणानुवादाचे गायन सुरु असताना या घरातील महिला वर्गाने आम्हा सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था केली. नंतर त्यांनी विणेकरी श्री.रावसाहेब सावंत यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. त्यांच्या अंगणात खेळ खेळण्याचा सोहळाहि रंगला. त्या घरातील सर्व स्त्री-पुरुषांनी आमच्यासवे खेळ खेळले. पुढच्या वर्षी नक्की या, असा त्यांनी आग्रह करून प्रेमपूर्वक आम्हाला निरोप दिला. आम्हा सर्वांनाच त्यांचे खूप कौतुक वाटले. त्या सर्वांचे आभार मानून व त्यांचे शुभचिंतन करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकणी आलो.

शासकीय विश्रामगृहात महिलांची व त्या पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या सांस्कृतिक भवनात (एक मोठा हॉल !) पुरुषांच्या थांबण्याची व्यवस्था केली होती. भोजनाची व्यवस्था विश्रामगृहाच्या समोरील व्हरांड्यात केली. विश्रामगृहात सर्वांना एकत्र बसण्याची व्यवस्था नसल्याने पारायण, कीर्तन सांस्कृतिक भवनात झाले. आजहि श्री.विक्रम नांदेडकर यांचेच कीर्तन झाले. त्यांनी आज संत श्रीनामदेव यांचे आख्यान सांगितले. संवादिनीच्या साथीला श्री.रावसाहेब सावंत हे होते. श्री.रावसाहेब यांनी पदयात्रेतील सर्व कीर्तनांत सर्व कीर्तनकारांना संवादिनीची उत्तम साथ केली. कीर्तनानंतर संतांच्या प्रतिमेसमोर उभे राहून श्री.बाबा काचरे आरती करायचे. त्या प्रतिमेची स्थापना आज विश्रामगृहात केली होती अन् कीर्तन इकडे झाले. आता आरती कोणापुढे करायची ? असा प्रश्न उपस्थित झाला. संत नामदेवांच्या आख्यानात ईश्वराच्या व्यापकतेचा प्रसंग आहे. त्याचा दाखला देत “त्या व्यापक ईश्वराची येथूनच आपण आरती करू” असे श्री.विक्रम म्हणाले. त्यांच्या या समयसूचकतेला सर्वांनी मनापासून दाद दिली. श्री. विक्रम यांचे आजचेहि कीर्तन छान झाले. नेमून दिलेल्या वेळेत सर्व कथाभाग त्यांनी व्यवस्थित सांगितला. विषयाचा नेमकेपणा व प्रभावी सादरीकरण, ही त्यांच्या कीर्तनाची प्रमुख वैशिष्ट्ये याहि वेळी दिसून आली.

महिला वर्गाला परत ये-जा करायला नको म्हणून रात्रीचा श्रीविष्णुसहस्रनामाचा पाठ कीर्तनानंतर लगेच घेण्यात आला. रात्रीचा अल्पोपहार विश्रामगृहाच्या आवारात देण्यात आला. तो घेऊन मंडळी निद्रादेवीची आराधना करण्यास आपापल्या जागेवर गेली.

(५) दि.३०/०१/२०१९, बुधवार = पिलीव ते धुळदेव, ता.माण.

अंतर १५ किमी / मुक्काम : श्रीम्हंकाळेश्वर धुळदेव संस्थान, धुळदेव.

कडाक्याची थंडी असली तरी तिला न जुमानता पहाटे ०३ वाजता उठण्याच्या जणू पायंडाच पडला होता. त्यानुसार पहाटे ०३ वाजलेपासून मंडळींची आवरण्याची घाई सुरु होती. सांस्कृतिक भवनात पाण्याची सोय नव्हती. बाजूच्या एका सद्गृहस्थाने आम्हाला स्नानासाठी पाणी व जागा उपलब्ध करून दिली. माझ्या सोबत साताऱ्याचे श्री.भिडे काका होते. (२०१८ साली मी आळंदी – पंढरपूर ही वारी केली. त्यावेळी या श्री. दत्तात्रेय भिडे (६७) यांची गाठ पडली. सात्विक वृत्तीचे गृहस्थ, आध्यात्माची आवड, श्री.गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित. आळंदी वारी नंतरहि आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. आपल्या सज्जनगड पदयात्रेचे निश्चित झाल्यावर त्यांना मी येण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी आनंदाने होकार भरला. पू.दादा व पू.अप्पा यांच्याविषयी त्यांना बरीच माहिती होती. पू.अप्पांचे बरेच ग्रंथहि त्यांनी वाचले आहेत. तथापि ते प्रथमतःच आपल्या परिवाराच्या कार्यक्रमात सामील झाले होते.) शौचाला बाहेर एकीकडे, स्नानाला दुसरीकडे, एकंदरीत वयस्कर मंडळींसाठी पिलीव येथील ही व्यवस्था जरा अडचणीचीच होती. मी त्यांना या बाबत बोललो, तेव्हा त्यांनी त्यावर अंधारात भल्या पहाटे जे उत्तर दिले, ते माझ्या अजून स्मरणात आहे, नव्हे ते वाक्य माझ्या स्मृतिपटलावर कोरल्या गेले आहे. ते म्हणाले, “अरुणराव, आहे त्या परिस्थितीशी कुरकुर न करता जुळवून घेणे, हेहि एकप्रकारचे अध्यात्मच आहे.” यावरून श्री.भिडे काकांच्या विचारांची बैठक लक्षात आली. ही सर्व पदयात्रा श्री.भिडे काकांनी मोठ्या आनंदात, सर्व कार्यक्रमात मनापासून भाग घेत पूर्ण केली.

आपापल्या ठिकाणीच म्हणजे शासकीय विश्रामगृहात महिलांची व सांस्कृतिक भवनात पुरुषांची आज सकाळची प्रार्थना होणार होती. आम्हा पुरुष मंडळींचे आज लवकरच आवरून झाले. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिकपणे श्रीविष्णुसहस्रनामाचा पाठ केला. नंतर श्री.विक्रम यांच्या नेतृत्वात आम्ही प्रातःकालीन प्रार्थना पूर्ण केली व ०६२० वाजता सर्वजण विश्रामगृहाच्या आवारात जमा झालो. तिथे भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा रंगला व नंतर संतांचा जयघोष करीत दिंडी मार्गस्थ झाली. सूर्योदयाला सूर्यनारायणाची प्रार्थना झाली.

आज आमच्या दिंडीने सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यात प्रवेश करून थोडेच अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूला श्रीदत्तात्रयाचे प्रशस्त मंदिर लागले. तिथे पदयात्री विसावले. आता सतत एकमेकांच्या सोबत राहून गोरट्याच्या माउल्यांच्या मनाची भीड बरीच कमी झाली होती. त्या स्वतःहून गाणी, भजनं म्हणायला पुढे येऊ लागल्या. त्यांच्या पैकी सौ.गोदावरीबाई दांगट, सौ.लक्ष्मीबाई (पाटील) सावंत व इतर २/३ जणींनी मिळून एक छान लोकगीत सादर केले. त्या गीताचे बोल होते –

काय बाई स्वस्त, लुगडं मस्त, लुगडं पाश्श्याचं (रु. ५००/-)

घ्याना हो दादा मला बी लुगडं, पंढरीला जायाचं ll

हे गाणे त्यांनी ठसक्यात व उडत्या चालीत आत्मविश्वासाने सर्वांपुढे सादर केले. गाण्याची चाल छान व बोल सोपे असल्याने या गीताने सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. पुढे प्रत्येक वेळी याच गाण्याची फर्माईश होऊ लागली. हे गाणे पदयात्रेत फारच लोकप्रिय ठरले.

आमचा आजचा मुक्काम असलेले धुळदेवचे मंदिर खूप प्रशस्त होते. भरपूर जागा व मोकळे आवार असल्याने मंडळी आज जरा जास्तच मोकळी पसरली. या गावाचा एक भाविक नियमितपणे उज्जैनला भगवान शंकर श्रीमहाकाळाच्या दर्शनाला जात असे. पुढे वय झाल्यावर उज्जैनला जाणे जमेना. तेव्हा त्याने महादेवाची करुणा भाकली. आशुतोष भगवान शंकर प्रसन्न झाले व तुझ्याच गावी श्रीम्हंकाळ धुळदेवाच्या रूपात नित्य वास करेन असा आशीर्वाद दिला. तेच हे धुळदेवचे श्रीम्हंकाळ – मिताई देवी मंदिर. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दररोज सकाळ – संध्याकाळ भगवंताची आरती असते. मंदिर परिसरात असलेल्या सर्व देवतांना आरती ओवाळली जाते. पुजारी आरती घेऊन सर्व मंदिरभर फिरतो. त्यावेळी त्याच्या सोबत ढोल वाजवणारेहि असतात. असा मोठा आगळा – वेगळा आरतीचा सोहळा तिथे दररोज होतो. सायंकाळच्या आरतीची वेळ ०६ ते ०६३० असल्याने आमच्या रोजच्या वेळात बदल केला गेला. ०४३० वाजता चहापान, ०५ ते ०६ पारायण, ०६३० ते ०८ कीर्तन व नंतर अल्पोपहार असा कार्यक्रम निश्चित झाला. त्यामुळे येथील आरतीला आम्हा सर्वांना उपस्थित राहता आले.

आजचे कीर्तन सौ.मीराताई जोशी यांनी केले. त्यांनी आज संत श्रीतुलसीदास यांचे आख्यान सांगितले. शके १९३८ हे श्री दासगणू महाराजांच्या जन्माचे सार्धशती (१५०) वर्ष होते. त्यानिमित्ताने झालेल्या मृत्तिका संकलनाच्या उपक्रमादरम्यान सौ.मीराताई उत्तर प्रदेशातील श्रीतुलसीदासांच्या राजापूर या गावी जाऊन आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विवेचनात तो सर्व उल्लेख आला. त्या स्वतः हिंदी विषयाच्या प्राध्यापिका असल्याने हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांच्या विवेचनात दोहे, शायरी यांची रेलचेल होती. त्यांचे कीर्तनहि छान झाले. कीर्तनानंतर लगेचच आजचा पाठ घेण्यात आला.

कीर्तनाला या मंदिराचे दोन विश्वस्त उपस्थित होते. पदयात्रींच्या मुक्कामासाठी त्यांनी मंदिर उपलब्ध करून केलेल्या सहकार्याबद्दल कीर्तनानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. (आमच्या व्यवस्थापक मंडळींनी असा यथोचित सत्कार सर्वच ठिकाणच्या व्यक्तींचा केला. हा सत्कार आम्हा सर्वांसमोर झाला त्यामुळे आमच्या लक्षात आला.) येथे पाण्याचा तुटवडा असल्याने उद्याची स्नानं पुढील मुक्कामाच्या ठिकाणी करावीत, अशी सूचना व्यवस्थापक मंडळाने दिली. अल्पोपहारानंतर मंडळी दिवस भराच्या विविध घटनांची उजळणी करीतच झोपेच्या आधीन झाली.

(६) दि.३१/०१/२०१९, गुरुवार = धुळदेव ते म्हसवड, ता. माण.

अंतर १२ किमी / मुक्काम : गणेशाई अप्रतिम भवन (मंगल कार्यालय), म्हसवड.

भल्या पहाटे जाग येणे हे आता अंगवळणी पडले होते. श्रीम्हंकाळ धुळदेवचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. उठून बाहेर आलो व समोर दाट चांदण्यांनी भरलेले आकाश दिसले. शहरातील विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे असे दाट चांदण्यांनी भरलेले स्वच्छ आकाश पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. क्षितीजाच्या थोडे वर सुंदर चंद्रकोरहि दृष्टीस पडली. लगेचच पू. अप्पांना श्री नारायणाचे जे सगुण रूपात दर्शन झाले, त्यातील “डावीकडे आकाशात दिसणारा अर्ध्याहूनहि लहान चंद्र, वद्य पक्षातील एकादशीस दिसणारा” या वर्णनाचे स्मरण झाले. (श्रावण वद्य ११, १८९२ / दि.१६ ऑगस्ट १९७१, सोमवार या दिवशी पू. अप्पांना श्री नारायणाचे सगुण रूपात दर्शन झाले आहे.) पू. अप्पांना दर्शन झाले ती (श्रावण) वद्य एकादशी होती, आजहि (पौष) वद्य एकादशीच ! आणि ती मंगल घटिका हीच ! त्या सर्व प्रसंगाचे स्मरण करून श्री वरद नारायणाला मनोमन वंदन केले.

सर्व मंडळी आवरून प्रातःकालीन प्रार्थनेला सिद्ध झाली. आश्चर्याची बाब म्हणजे पंढरपूरातून आमची साथ करणारे दोन श्वान अजूनहि आमच्या सोबत होते व आता तर सर्वांच्या परिचयाचे झाले होते. प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता. श्री.विक्रम त्यांच्या खानपानाची विशेष काळजी घेत असल्यामुळे त्यांच्याशी त्या दोघांची खूपच जवळीक झाली होती. आमच्या सर्व कार्यक्रमाची, वेळांची या श्वानांना इतकी सवय झाली की, प्रार्थना, कीर्तन चालू असताना ते एका जागी बसून असायचे, पावली सुरु असताना ते दोघे भजनकऱ्यांच्या रिंगणात येऊन उभे असायचे. प्रार्थना व पावलीचा सोहळा झाला की पुढील ठिकाणची व्यवस्था लावण्यासाठी श्री.विक्रम व श्री.विलास हे दोघे दिंडी सोबत न येता, वेगाने चालत जाऊन पुढचे ठिकाण गाठायचे. श्वानांची ही जोडी श्री.विक्रम व श्री.विलास यांच्या सोबत पुढे जाऊन मागवून येणाऱ्या मंडळींच्या स्वागतासाठी उभी असायची. त्यांची ही वागणूक पाहून आम्हा सर्वांना खूपच आश्चर्य वाटत असे व सज्जनगड पर्यंत ही जोडी नक्की सोबत येणार याची खात्री पटली होती.

प्रार्थना झाली, भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा नेहमी प्रमाणे रंगला. श्रीम्हंकाळ धुळदेवाचे आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडू लागलो तेव्हा काल सायंकाळी ज्या पुजाऱ्याने आरती केली होती, तो धावतच मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी उभा ठाकला व आम्हा सर्वांना हात जोडून “परत या” असे म्हणत निरोप देऊ लागला. त्याची ही कृती मला खूप भावली.

आमच्या पदयात्रेच्या मार्गावरील सर्वच रस्त्यांचे सर्वत्र सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु होती. दिड ते दोन फूट जाडीचे काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम सुरु होते. काही कामे पूर्ण झाली होती तर बऱ्याच ठिकाणी कामे प्रगती पथावर होती. बाजूने बस, ट्रक या सारखे मोठे वाहन गेले की धुळीचा त्रास व्हायचा. बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले होते. त्यामुळे चालताना सारखे वर-खाली होत होते. खरे तर याचा खूप त्रास व्हायचा. पण मागील सरकारांनी जेव्हढे काम गेल्या कित्येक वर्षात केले, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक काम सध्याचे सरकार करते आहे, याचे सर्वांना कौतुक वाटायचे. मंडळी म्हणायची – आता थोडा त्रास सोसू यात, पण ज्या दर्जाचे काम आता होते आहे, त्यामुळे पुढे अनेक वर्ष सुखावह जातील. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. आणि तसेहि पदयात्रा हे शारीरिक तप असल्याने “देहे दुःख हे सुख मानीत जावे” या समर्थ वाचनाचा गर्भित अर्थ लक्षात घेता; अशा पदयात्रेतून मिळणारे शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी गैरसोयीलाच सोय किंवा उपलब्ध असलेल्या सोयीला सर्वोत्तम मानायची सवय लावावीच लागते.

पण या खडबडीत रस्त्यांवरून चालताना एके ठिकाणी एक माउली (सौ.गोदावरीबाई लंगोटे) दगडांना अडखळून पडली. नाकावर व कपाळावर जखम झाली. लगेचच त्यावर मलमपट्टी करण्यात आली. एखाद्याने चालण्यातून माघार घेतली असती, पण या माऊलीची श्रद्धा व निर्धार पक्का होता. जखमेची काळजी घेत व दुखण्याकडे दुर्लक्ष करीत पदयात्रा पूर्ण केलीच. पुढे ऐके ठिकणी श्री.स्वप्नील कवटीकवार यांचा पाय मुरगळला. त्यांनीहि पाय दुखत असताना (योग्य ती काळजी घेत) वारी पूर्ण केलीच. ‘पायांना फोड येणे’ हे तर सामान्य लक्षण झाले होते. रोज रात्री फोडांना मलम लावणे, पायांना तेल चोळणे हा ठरलेला सामुदायिक कार्यक्रम असायचा.

आजचा दिवस माझ्या दृष्टीने महत्वाचा ठरला. गोरट्यात रोज सकाळी ०७ वाजता ध्यानमंदिरात प्रार्थना होत असते. त्या प्रार्थनेची सुरुवात श्री तुकाराम महाराजांच्या “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी” या श्रीविठ्ठलाच्या सगुण रूपाचे वर्णन करणाऱ्या अभंगाने होते. ही प्रार्थना ०७ वाजता जरी असली तरी गोरट्यात असताना मी अर्धा-पाऊण तास आधीच ध्यानमंदिरात बसत असतो. ज्या सगुण रूपात पू. अप्पांना श्रीवरद नारायणाने दर्शन दिले आहे, नारायणाच्या त्या सुंदर प्रतिमेला न्याहाळताना वेळ कसा जातो ते कळत नाही. पू. अप्पांच्या त्या ‘दर्शन’ प्रसंगाची व दैवीदेणगी लाभलेले सिद्धहस्त चित्रकार कै. कल्याण शेटे यांना सदर चित्र काढण्यासाठी पू. अप्पांनी दिलेल्या सूचना, यांची उजळणी करण्यात जो अवर्णनीय आनंद मिळतो, तो शब्दात व्यक्त करणे शक्य नाही.

असाच एकदा ध्यान मंदिरात बसलो असता, श्री तुकाराम महाराजांच्या “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी” या अभंगानुरूप, श्री वरद नारायणाच्या सगुण रूपाचे वर्णन करणारा अभंग मला सुचला. मूळ अभंगातील अगदी काही मोजक्या शब्दांमध्ये पालट केला असता हे काव्य तयार झाले. ते काव्य असे-

सुंदर ते ध्यान, प्रगटले सामोरी l

रूप चतुर्भुजधारी, घेवोनियां ll

पुष्पहार गळा, कासे पितांबर l

आवडे निरंतर, हेचि ध्यान ll

मणिक कुंडले, तळपती श्रवणी l

कंठीं कौस्तुभमणि, विराजित ll

अनंता म्हणे माझे, हेचि सर्व सुख l

वंदीन श्रीचरण, आवडीने ll

(माझ्या साठी हा पू. अप्पांचा आशीर्वादच आहे, असे मी समजतो. तथापि मला ज्ञात आहे की हे माझे मर्यादातिक्रमण आहे. असू देत. “दोषास घाली पोटी, शिशुवरती ठेवी माया” ही सर्व श्रेष्टींना विनंती.) माझ्या विनंतीस मान देऊन भजनकरी मंडळींनी आज हे काव्य चालीमध्ये गायले, याचा मला खूप आनंद झाला.

अजून न्याहरी घेऊन गाडी यायची होती अन् आम्ही म्हसवड गावाच्या वेशीवर पोहंचलो. तेव्हा मोठे आंगण व सावली असलेले एक छानसे घर दिसले. ते घर श्री.रामदास सोनावणे यांचे होते. आमची दिंडी असून काही वेळ येथे बसून भजने म्हणली तर चालेल का ? अशी चौकशी त्यांना केली. त्यांनी सहर्ष अनुमती दिली. लगेच मागाहून आमची न्याहरी घेऊन गाडी आली. तिथेच सर्वांनी न्याहरी केली व या घरातील मंडळींना हि न्याहरीचे पदार्थ दिले. नंतर सर्व भजनी मंडळ व पदयात्री गोल रिंगण करून बसली व तिथे भजने, गवळणी म्हणायचा कार्यक्रम रंगला. सौ. सोनावणे माउलीने आम्हा सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था केली. तिथेहि त्यांच्या अंगणात खेळ खेळण्याचा सोहळा रंगला. श्री. व सौ. सोनावणे हे दोघेहि आमच्यासवे खेळ खेळले. नंतर त्यांनी प्रेमपूर्वक आम्हाला निरोप दिला. त्या उभयंत्यांचे आभार मानून व त्यांचे शुभचिंतन करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो.

संतांच्या सात्विक शिकवणुकीची जपणूक अजूनहि समाजात मोठ्या प्रमाणात टिकून आहे. पिलीवचे भैस कुटुंबीय, पिलीवलाच स्नानासाठी पाणी व जागा उपलब्ध करून देणारा सद्गृहस्थ, म्हसवडचे श्री. व सौ. सोनावणे यांनी निर्हेतुकपणे केलेले आमचे अगत्य हे त्याचेच द्योतक होते.

गणेशाई अप्रतिम भवन (मंगल कार्यालय) हे आमच्या मुक्कामाचे ठिकाण म्हसवड गावापासून लांब अंतरावर होते. पण जागा प्रशस्त होती. तळ मजला आम्हाला दिला होता. तिथे गेले की मंडळींनी स्नानादी कार्यक्रम उरकले. आज एकादशीला फराळापूर्वी श्रीगीतेचा १५ वा अध्याय म्हणला. (एकादशीला मनातल्या मनात भगवंताचे स्मरण करीत फराळ करायचा असतो; श्लोक म्हणायचे नसतात, असा प्रघात आहे.) सर्वांनाच फराळाचे पदार्थ होते. फराळासाठी विविध पदार्थ होते व सर्वच पदार्थ रुचकर होते आणि मुख्य म्हणजे आम्रखंड होते. त्यामुळे मंडळी खुशीत होती. भोजनोत्तर विश्रांती व नंतर पारायण झाले.

या परायणासंबंधी एक बाब आवर्जून सांगावी अशी आहे. गोरट्यातील मंडळींना (विशेषतः महिलांना) वाचता येत नाही, तरी ते सर्वजण परायणाला बसायचे व लक्षपूर्वक पारायण ऐकायचे. आम्ही सर्व नेत्र पारायण करीत असू तर ही मंडळी श्रवणपारायण करीत असत. आम्हाला वाचता येत नाही, तर कशाला इतका वेळ बसून राहा, असा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. खरी श्रद्धावान मंडळी ! आध्यात्मात प्रगती होण्यासाठी बुद्धीपेक्षा श्रद्धा कामाला येते, असे पू.अप्पा म्हणायचे, ते खरेच आहे.

भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आ.वसू ताईंचे कीर्तन ! तो योग आज जुळून आला. आज त्यांनी संत श्रीमाणकोजी बोधले हे आख्यान सांगितले. अर्थातच कीर्तन छान झाले. श्रीमाणकोजी बोधले श्रीविठ्ठलाच्या भजनानंदात दंग होऊन जातात, असा एक प्रसंग या कीर्तनांत आहे. त्यांनी त्यावेळी “जय जय माधवम् कृष्णम्, सच्चीदानंद गोविंदम्” हे सुंदर भजन सांगितले. हे भजन गाताना स्वतः वसू ताई व सर्व भाविक त्या नामसंकीर्तनच्या आनंदात दंग झाले होते.

आजहि कीर्तनानंतर लगेचच आजचा पाठ घेण्यात आला. त्यानंतर अल्पोपहार झाला. “जय जय माधवम् कृष्णम्, सच्चीदानंद गोविंदम्” हे मधुर भजन गुणगुणतच मंडळी झोपी गेली.

(उर्वरित वृत्तांतासाठी भाग क्र. ३ पहा)